ग्रामपंचायतीत दारू दुकान थाटण्याचा प्रयत्न, निष्क्रिय प्रशासनामुळे संतप्त झाले गावकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:41 AM2017-10-24T05:41:12+5:302017-10-24T05:41:16+5:30
चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील वहाणगाव येथील ग्रामपंचायतीने कार्यालयातच दारूविक्रीचा फलक लावून दुकान थाटण्याचा प्रयत्न केला.
राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील वहाणगाव येथील ग्रामपंचायतीने कार्यालयातच दारूविक्रीचा फलक लावून दुकान थाटण्याचा प्रयत्न केला. तथापि, सतर्क पोलिसांनी हा प्रयत्न लागलीच हाणून पाडल्याने सोमवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी करण्यात आली असली तरी गावखेड्यांमध्ये राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. वहाणगावच्या नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदने दिली; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, प्रशासनाचा निषेध म्हणून २ सप्टेंबरला ग्रामसभा घेण्यात आली. गावातील अवैध दारूविक्री बंद करावी, अन्यथा गावकरीच देशी दारूची विक्री करतील, असा ठराव या ग्रामसभेत बहुमताने मंजूर केला होता.
मात्र, प्रशासनाकडून थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी सकाळी ८ वाजता गावकºयांनी ग्रामपंचायत कार्यालयातच देशी-विदेशी दारूचे दुकान असा फलक लावून एकजूट दाखवत दारूविक्रीचे दुकान थाटण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांचा ताफा वहाणगावात दाखल झाला. दारू विक्रीचा फलक जप्त केला.
>तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी गावात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. गावकºयांची समस्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर घालू, चर्चा घडवून आणू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.