थकीत करामुळे ग्रामपंचायत हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:30+5:302021-08-13T04:31:30+5:30
आशिष खाडे पळसगाव : शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली. तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा, ...
आशिष खाडे
पळसगाव : शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली. तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा, यासाठी ग्रामपंचायतची निर्मिती केली. ग्रामपंचायतीला नागरिकांकडून कर वसूल करावा लागतो व त्यावरच ग्राम विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. नागरिकांकडून पाणी कर, घरपटी कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पडसर जमीन यासारखे कर वसूल करावे लागतात. परंतु काही नागरिक कर भरण्यासाठी टाळटाळ करत आहे. त्याचा परिणाम ग्रामविकासावर होत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायतचे गावातील नागरिकांकडे सहा लाख ७२ हजार ४०० रुपये कर थकीत आहे. तर, चालू कर ४ लाख ३९ हजार ४१४ रुपये असून एकूण कर ११ लाख ११ हजार ८१४ रुपये येणे आहे. कळमना ग्रामपंचायतीचा नागरिकांकडे थकीत कर ६ लाख ७४ हजार ३२४ रुपये एवढे आहे. आमडी ग्रामपंचायतीचा नागरिकांकडे थकीत कर ५ लाख ९८ हजार २९२ आहे. कर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायत नागरिकांपुढे हतबल झाली आहे. ग्रामपंचायतने वारंवार सांगूनही नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहे.
बॉक्स
गाव विकासासाठी कर आवश्यक
एकंदरीत गावाचा विकास करायचे म्हटले तर, गावातील कर वसुली पूर्ण होणे आवश्यक आहे. तरच वसूल झालेल्या करातून गावात विविध सुधारणा करता येतात. नवीन रस्ते, नाली, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यविषयी विविध सुविधा गावात उपलब्ध करता येतात. परंतु सर्वच गावातील नागरिकांची कर भरण्याविषयी उदासीनता आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन कर भरावा, जेणेकरून गावात विकास कामे करता येतील, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून केले जात आहे.
कोट
थकीत करामुळे ग्रामविकासास एक प्रकारची खीळ बसलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी थकीत कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून वसूल झालेल्या करातून ग्रामविकासाचा आराखडा आखून गावात विविध विकासशील कामे करता येईल.
-संदीप पत्रुजी वेटे
सरपंच, ग्रामपंचायत पळसगाव