ग्रामपंचायतींच्या २६ जागांसाठी २२ एप्रिलला होणार मतदान
By admin | Published: April 10, 2015 12:52 AM2015-04-10T00:52:40+5:302015-04-10T00:52:40+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ एप्रिलला ४४ जागांसाठी निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत.
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ एप्रिलला ४४ जागांसाठी निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीतील २६ जागांपैकी तब्बल १८ जागांवर प्रत्येकी केवळ एकच नामांकन उरल्याने या ठिकाणी अविरोध निवडणुकीची स्थिती आहे. तर, तीन ग्रामपंचायतींमधील ८ जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. भद्रावती तालुक्यातील चेक बरांज ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ठरल्याप्रमाणेच होणार आहे.
भद्रावतील तालुक्यातील चेक बरांज ग्रामपंचायतीमध्ये छाननीनंतर दोन उमेदवार गळाल्याने सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २२ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्याने आतापासूनच गावात चुरस वाढलेली दिसत आहे.
जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या २४ जागांसाठीही २२ एप्रिलला पोटनिवडणुका होत आहेत. मात्र तब्बल १८ ठिकाणी केवळ एकच उमेदवार रिंगणात उरल्याने अविरोध निवडणुकीची स्थिती आहे. यामुळे उर्वारित ८ जागांसाठी पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. नागभीड तालुक्यातील येनोली माल गावात अ.जा. (महिला) प्रवर्गासाठी दोन जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. येथे चार उमेदवार रिंगणात आहेत. तर, किटाळी मेंढा गावातील पोटनिवडणुकीत ओबीसी (महिला) प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार उभे आहेत. तर, कोरपना तालुक्यातील वनसडी येथील पोटनिवडणुकीत अनुसुचित जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी एकास एक लढत होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)