ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू देणार नाही
By Admin | Published: January 25, 2016 01:28 AM2016-01-25T01:28:44+5:302016-01-25T01:28:44+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या
चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या वर्षी ७४ किलोमीटर तर पुढील वर्षी ९२ किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या योजनेतील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असावी यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजनांतर्गत निधी वाटपासाठी असलेली कोअर, नॉनकोअर मर्यादा शिथील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
हुमन प्रकल्प लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलाची सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यासाठी त्यांनी नगर विकास खात्याच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती, महानगर पालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा, महानगरपालिका-नगरपालिका पायाभूत सोई-सुविधा विशेष निधी, बाबुपेठ उड्डाण पुल, दाताळा येथे म्हाडातर्फे ब्रिज बांधणे, जिल्हा वार्षिक योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प इत्यादी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दुरुस्तीसंदर्भातील शासन निर्णयामध्ये असलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पालक सचिवांना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या गावात ४ हजार २२९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ८३१ कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित ३ हजार ८२७ कामे मार्चअखेर पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून १४ हजार ४७४ टिसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून ३ हजार १६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र झाले आहे. पुढील वर्षी २६३ गावांची निवड करण्यात येणार असून यामध्ये जनवन योजनेतील ५० गावांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)