राष्ट्रसंताच्या विचारातूनच ग्राम समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:01 PM2019-03-10T22:01:01+5:302019-03-10T22:01:16+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी सामुदायिक प्रार्थनेची परंपरा सुरू केली. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. ग्रामगीता लिहून गावाच्या विकासाची दिशा दिली. गावावरूनच देशाची परीक्षा होत असल्याने आपले गावच तीर्थ करावे. राष्ट्रसंताच्या विचारातून गावात समृद्धी येते, असे प्रतिपादन जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी सामुदायिक प्रार्थनेची परंपरा सुरू केली. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. ग्रामगीता लिहून गावाच्या विकासाची दिशा दिली. गावावरूनच देशाची परीक्षा होत असल्याने आपले गावच तीर्थ करावे. राष्ट्रसंताच्या विचारातून गावात समृद्धी येते, असे प्रतिपादन जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केले.
श्री गुरूदेव सेवा मंडळ व समस्त जनता जनार्धन तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात तीन दिवसीय राष्ट्रसंत सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष रिता उराडे, प्राचार्य एन. एस. कोकोडे, भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, अॅड. भेंडारकर, वेरूळकरगुरूजी, ठाणेदार प्रमोद मकेश्वर, किशोर तिडके, वनिता ठाकूर प्रा. कोकोडे, नगरसेविका लता ठाकूर आदींची उपस्थित होती.
सभापती सहारे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी स्वच्छता, समता, बंधुता, सत्य, स्वांतत्र्य, न्याय मूल्यांची समाजात रूजवण केली. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबन हे ग्रामनिर्मिती जीवनाचे अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. डॉ. कुुंभारे यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे मोठेपण स्पष्ट केले. प्रास्ताविक निलकंठ रणदिवे, संचालन तेजश गायधनी यांनी केले. त्र्यंबक बन्सोड यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.