ग्रामसेवक, पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:52 PM2018-07-26T23:52:17+5:302018-07-26T23:52:54+5:30
गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तारसा बूज ग्रामपंचायत येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तारसा बूज ग्रामपंचायत येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.
तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये घरकूल योजनेसाठी अर्ज मागविले जात आहेत. हे अर्ज मागविल्यानंतर त्या संबंधीची यादी पंचायत समितीमार्फत अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाते. मात्र तारसा बूज येथील ग्रामसेवक हरीहर गुरुनुले यांनी पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत घरकूल मिळावे, या मागणीसाठी शेकडो अर्ज आले होते. यातील केवळ २४ अर्ज वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती पुढे आली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामसेवक गुरूनुले व सरपंच सुनील उराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना चक्क तासभर ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. परिणामी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची मोठी गोची झाली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र रेषेखालील गरजू घटकांसाठी शासनाने घरकुलची योजना अंमलात आणली. पण गरजुंना घरकूल मंजूर करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तारसा येथील ग्रामसेवकाने शेकडो अर्जातून केवळ २४ अर्जच वरिष्ठ स्तरावर पाठवले आहेत. दरम्यान, संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन मासिक सभा चालू असताना सचिव व सरपंचांना जाब विचारला. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने समाधानी न झालेल्या गावकऱ्यांनी मासिक सभेतच पदाधिकाऱ्यांना घेराव घातला. मनमर्जीने काम करणाऱ्या ग्रामसेवकासह पदाधिकाऱ्यांना तासभर डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती दीपक सातपुते गावात दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केल्याने गावकरी शांत झाले. परंतु पात्र व्यक्तींना घरकूल मिळणार नसल्याने गावात प्रचंड नाराजी होती. या प्रश्नावर तोडगा शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवडीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले.