ग्रामसेवक कार्यालयाच्या चाब्या सुपूर्द
By admin | Published: November 18, 2016 12:56 AM2016-11-18T00:56:48+5:302016-11-18T00:56:48+5:30
जिल्ह्यातील चिमूर पंचायत समितीपासून सुरू झालेल्या ग्रामसेवकाच्या असहकार आंदोलनाने आता मोठे रूप धारण केले आहे.
आंदोलन तीव्र : ७५० ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प
चिमूर : जिल्ह्यातील चिमूर पंचायत समितीपासून सुरू झालेल्या ग्रामसेवकाच्या असहकार आंदोलनाने आता मोठे रूप धारण केले आहे. गुरूवारी राज्यातील सर्वच ग्रामसेवकांनी ग्रामसेवकांच्या कार्यालयातील कपाटाच्या चाब्यासह सर्वच सिक्के तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ७५० ग्रामसेवकांच्या कार्यालयाच्या चाब्या व शिक्के बीडीओच्या हातात दिले आहेत.
ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र प्रशासनाकडून दखलच घेण्यात येत नव्हती. अनेक शासकीय योजना राबविणारा ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढारी यांच्यामध्ये भरडला जात आहे. त्यातून अनेक ग्रामसेवकांनी आत्महत्याही केल्या असल्याचा संघटनेचा आरोप आहे. या संदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देवूनही ग्रामसेवकांच्या मागण्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून प्रशासनाविरूद्ध आंदोलनाची श्रृंखला सुरू केली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सर्वच ग्रामसेवकांनी तालुक्यातील पंचायत समितीमधील कार्यरत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे कार्यालयाच्या चाब्या व शिक्के स्वाधीन केले आहेत. चिमूर पंचायत समितीमधील ९३ ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाब्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सरचिटणीस पदमाकर अल्लीवार यांच्या नेतृत्वात गुरूवारी स्वाधीन करण्यात आल्या. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींची कामे प्रभावित
ग्रामसेवकाच्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे काम प्रभावित होणार आहे. चिमूर तालुक्यातील विकास कामे व शासनाच्या योजना रखडणार आहेत.
अनेक दाखल्यापासून नागरिक वंचित
ग्रामीण भागातील नागरिकांना रहिवासी दाखला, जातीचा दाखला, बिपिएल दाखला, जन्म-मृत्यू दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासह शासनाच्या अनेक योजनांचे दाखले ग्रामसेवकाच्या या आंदोलनामुळे नागरिकांना मिळणार नाहीत.
गोंडपिपरीतही आंदोलन
गोंडपिपरी : यापूर्वी पंचायत समितीस्तरापासून ते आयुक्तालयापर्यंत ग्रामसेवकांनी धरणे देवून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतरही समस्यांची पुर्तता झाली नसल्याने संतप्त ग्रामसेवकांनी आज राज्यभर असहकार आंदोलन केले. गुरूवारी सकाळीच ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाब्या व आपले शिक्के त्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या स्वाधिन केले. यावेळी ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने यशवंत मोहितकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून समस्या त्यांपुढे मांडल्या. शिष्टमंडळात गोंडपिपरी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सुखदेवे, उपाध्यक्ष माधुरी लोखंडे, सचिव प्रमोद भोयर, हर्षवर्धन खोब्रागडे, मुकेश हजारे, मिलिंद देवगडे, भावगिता निकोडे, धनराज गेडाम, दिलीप घडले, अनिल आरके, कीर्तिमंत मंगर यांचेसह तालुक्यातील इतर ग्रामसेवकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)