पिण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या आजोबा-नातीचा विहिरीत बुडून मृत्यू
By राजेश भोजेकर | Published: June 18, 2024 06:58 PM2024-06-18T18:58:21+5:302024-06-18T18:59:01+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिमागास जिवती तालुक्यातील घटना
चंद्रपूर : शेतात पेरणी करताना लगतच्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेला शेतकरी पाय घसरून विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी सोबत गेलेली १४ वर्षीय मुलही गेली असता तीही विहिरीत पडली. यामध्ये दोघांचाही विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना जिवती तालुक्यातील टाटाकवडा पाटण शिवारात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. शंकर बळीराम गेडाम (५०) व जावयाची भाची पूर्वी भानुदास गेडाम (१४) अशी मृतकांची नावे आहेत.
शंकर गेडाम हे पत्नी अनुसया गेडाम, मुलगा बालाजी गेडाम, मुलगी पूजा कुंभरे, जावई प्रेम कुंभरे व जावयाची भाची पूर्वी गेडाम तसेच अवंतिका अशोक कुळसंगे यांना सोबत घेऊन पेरणीकरिता शेतात गेले होते. दुपारी तहान लागली म्हणून शंकर गेडाम शेजारचे शेतकरी केशव परतले यांच्या शेतात पाणी आणण्याकरिता गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या जावयाची भाची पूर्वी व अवंतिका कुळसंगे (१०) या दोघीही गेल्या होत्या. विहीर नादुरुस्त असल्याने शंकर गेडाम यांचा पाणी काढताना पाय घसरला. त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले.
आजोबा विहिरीत पडल्याचे पाहुन जावयाची भाची पूर्वी गेडाम त्यांना वाचविण्यासाठी धावली. ती सुद्धा विहिरीत पडली. या घटनेने हादलेल्या १० वर्षीय अवंतिका कुळसंगे हिने आरडा-ओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून शेतात असलेला शंकरचा मुलगा बालाजी धावून गेला. त्याने दोरीच्या सहायाने दोघांनाही वाचविण्याचा आटोकात प्रयत्न केला. पात्र उपयोग झाला नाही. बालाजी पोहता येत नसल्याने तो पाण्यात उतरला नाही. यानंतर सर्व कुटुंबीय विहिरीकडे धावत आले. तसेच शेजारचे शेतकरी अरुण बालाजी वाघमारे, नामदेव कोमा राठोड व इतर लोकांच्या मदतीने पाण्यात उतरून वडील व पूर्वी गेडाम यांना बाहेर काढले. तोपर्यंत उशिर झाला होता. दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा पाटण पोलिसांनी केला. अधिक तपास सुरू आहे.