नगर पंचायतीसाठी आजी-माजी पालकमंत्री मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:38+5:30
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोणत्या पक्षाला कौल देतो, हे १९ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.
राजेश भाेजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुका रंगतदार होत आहे. राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. उमेदवार डोअर टु डोअर प्रचारात गुंतले आहेत. आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीची धुरा आजी-माजी पालकमंत्र्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री विजय वडेट्टीवार तर भाजपकडून माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कंबर कसल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे.
सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या सहा नगर पंचायतींची निवडणूक २१ डिसेंबरला होत आहे. ओबीसी प्रवर्ग रद्द झाल्याने या प्रवर्गाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांवर आपल्याच पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी स्थानिक पुढारी प्रचारात व्यस्त आहेत. या पुढाऱ्यांना बुस्टर डोस देण्याचे काम जिल्ह्यातील बडे नेते करत आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष गेल्या पाच वर्षांचा विचार करता प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री विजय वडेट्टीवार तर भाजपकडून माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बारीक लक्ष ठेवून आहेत.
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोणत्या पक्षाला कौल देतो, हे १९ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.
नगर पंचायतीच्या प्रचारात तिजोरीवर चर्चा
- प्रचार सभेत आमदार सुधीर मुनगंटीवार हे राज्यात भाजपची सत्ता असताना घडवून आणलेल्या विकासाचे दाखले देत मते मागत आहे. तर ना. विजय वडेट्टीवार हे आता सरकारची तिजोरी आमच्याकडे आहे.
- काँग्रेसकडे सत्ता आल्यास कायापालट करण्याचा शब्द मतदारांना देत आहे.
- राज्यात भाजप सत्तेत असताना सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते. यावरून निवडणुकीत तिजोरी शब्द चांगलाच चर्चेत आहे.
आमदार आणि माजी मंत्रीही प्रचारात
जिवती मागास तालुका आहे. तो राजकीयदृष्ट्या मागास असला तरी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दखलपात्र असल्याचे दिसून आले. काँग्रेसची धुरा त्यांचे धाकटे बंधू राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे हे सांभाळत आहे. भाजपकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही येथे सभा घेऊन चुरस निर्माण केली आहे.