शेडनेटसाठी मिळणार अनुदान; पोखरा योजनेत चंद्रपूरचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 01:17 PM2024-08-06T13:17:19+5:302024-08-06T13:18:24+5:30
लवकरच सुरू होणार : नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा व अन्य योजनेंतर्गत फळ, फूलशेती व पालेभाज्यांच्या वाढीव उत्पन्नासाठी शेडनेट उभारण्याची राज्य शासनाची योजना आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ही योजना सुरू होती. आता चंद्रपूर जिल्ह्यातही या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी शेडनेटचा वापर करणे सोईचे होणार आहे.
शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये पीक घेता येते. बिगरहंगामी पिकांसाठी शेडनेट हा त्यातील चांगला उपक्रम ठरला आहे. शेतकरी शेडनेटचा वापर करून कमी जागेत लाखो रुपयांचे उत्पन्न घेता येते. त्यामुळेच कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा योजना राबविण्यात येते. या हंगामात चंद्रपूर जिल्ह्याचा सहभाग झाला आहे. लवकरच ही योजना जिल्ह्यात सुरू होणार आहे.
काय आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजना?
जागतिक बँकेच्या सहकायनि राज्य शासनाद्वारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजना अद्याप जिल्ह्यात नाही. यंदाच्या हंगामात जिल्ह्याचे नाव आले आहे. परंतु, शासनाचे निर्देश आले नाही. लवकरच ही योजना सुरू होणार आहे.
अनुदान किती ?
योजनेत १००८ चौ. मीटर सेडनेट उभारण्यासाठी प्रकल्पाचा खर्च ७४२ रुपये प्रति चौ. मीटरचे अनुदान दिले जाते. यासाठी ७१० रुपये किमान ३.५५ लाख किंवा आकारमानानुसार कमी-जास्त अनुदान दिले जाते, उर्वरित प्रति ३४ रुपये चौ. मीटर असा खर्च लाभार्थ्यांना करावा लागतो.
शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
नानाजी देशमुख योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनुदानात शेडनेट उभारता येणार असल्याने शेतकरी लाभ घेऊ शकतात.
कृषी अधिकारी म्हणतात
"नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी आता चंद्रपूर जिल्ह्याचे नाव आले आहे. लवकरच ही योजना जिल्ह्यात सुरू होणार आहे."
- शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपुर
ही कागदपत्रे तयार ठेवा
शेतकऱ्याचा सातबारा, नमुना आठ अ उतारा, अर्जदार अनुसूचित जाती किवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, शेडनेट हाऊस संदर्भातील प्रशिक्षण प्रमाणपत्र.
शेडनेटमुळे उत्पादनवाढीसाठी होणार मदत
शेडनेटचा वापर शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होत आहे. फळ, फूलशेती व पालेभाज्यांच्या वाढीव उत्पादनासाठी शेडनेट फायद्याचे आहे. त्यामुळे बरेच शेतकरी शेतात शेडनेट उभारत आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा योजनेत शेडनेटसाठी अनुदान आहे. या योजनेसाठी जिल्ह्याचा समावेश झाला आहे.