गोरगरिबांना लाभ मिळावा म्हणून सोडले अनुदान
By admin | Published: January 19, 2017 12:52 AM2017-01-19T00:52:02+5:302017-01-19T00:52:02+5:30
देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे,
‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना : हरदोना येथील लाभार्थ्यांना प्रथम क्रमांक
सास्ती : देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे, असे आवाहन देशवासीयांना केले. त्या अंतर्गत अनुदानातून बाहेर पडा या योजनेत राजुरा तालुक्यातील हरदोना गावातील लाभार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
देशाला बळकट करण्याकरिता मोदी सरकार विविध योजना राबवित आहे. त्यातील एक योजना म्हणजे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानाचा त्याग करणे ही होय. त्यात सिलेंडरवर मिळणारी सबसिडी असो की विविध योजनात मिळणारे अनुदान असो त्याचा त्याग करुन देशाच्या आर्थिक उभारणीत आपला मोलाचा वाटा ठरणार आहे. अशा प्रकारच्या जनजागृतीची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. त्या अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अनुदानातून बाहेर पडा या योजनेत सहभागी होण्याकरिता जनजागृती सुरू केली. यात राजुरा तालुक्यातील हरदोना येथील संबाशिव पिंपळशेंडे, पुरुषोत्तम मोरे, अशोक मांडवकर, मेघश्याम बोबडे, सुनिता महादेव निल या पाच शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडून या योजनेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कुणीही कोणत्याही मार्गाचा अवलंब करून लाभ मिळवितात. त्यामुळे खरे लाभार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहतात. तर यात देशाचेही मोठे नुकसान होते. परंतु मिळणारा लाभ सोडण्याची कुणाचीही तयारी नसते. आपल्यापेक्षा अधिक गरीबांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता कमी दराने मिळणारे धान्य नाकारुन हरदोना येथील या पाच लाभार्थ्यांनी आपले अनुदान सोेडून एक आदर्श निर्माण केला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमामध्ये सामावून या योजने अंतर्गत नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. परंतु आता ज्यांच्या परिस्थितीत बदल झाला, अशा पात्र शिधापत्रिकाधारक नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्यापेक्षा अधिक गरीब असलेल्या नागरिकांना याचा लाभ देण्याकरिता व देशाच्या बळकटीकरिता समोर येण्याचे आवाहन विभागाने केले होते. ग्राहक दिनाचे औचित्य साधून या योजनेत सहभागी झालोल्या नागरिकांचे स्वागत तहसीलदार धर्मेश फुसाटे, सरपंच संगिता मेश्राम, उपसरपंच किसन टेकाम यांनी केली. (वार्ताहर)