ग्रामबंधूच्या आत्मिक प्रेमाचा ऋणी
By admin | Published: April 26, 2017 12:43 AM2017-04-26T00:43:44+5:302017-04-26T00:43:44+5:30
माझा अमृत महोत्सवानंतरचा हा प्रथम सत्कार असून या सत्काराने माझ्या आजपर्यंतच्या सर्व कार्याची परिपूर्तता झाली आहे.
वसंत आबाजी डहाके : बेलोरा येथे नागरी सत्कार
चंद्रपूर : माझा अमृत महोत्सवानंतरचा हा प्रथम सत्कार असून या सत्काराने माझ्या आजपर्यंतच्या सर्व कार्याची परिपूर्तता झाली आहे. कारण माझे बालपण गेलेल्या गावातील माझ्या ग्रामबंधूनी आत्मिक प्रेमभावानेने हा सन्मान मला दिला आहे, असे प्रतिपादन प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले.
८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत डहाके यांचा नागरी सत्कार बेलोरा येथील गावकऱ्यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गावातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सोबत प्राथमिक शाळेत असणाऱ्या अनेक वर्गमित्रांचा व शिक्षकांचा ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. वामनराव चटप होते. मुख्य अतिथी प्रा. श्याम धोपटे उपस्थित होते. बेलोरा हे गाव प्रा. वसंत हडाके यांची जन्मभूमी असून त्यांचे बालपण याच गावात गेले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. या संदर्भातून ग्रामस्थांनी ग्रामजयंती उत्सवाअंतर्गत या सत्काराचे आयोजन केले होते.
प्रा. डहाके यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर स्वागताध्यक्ष व सरपंच प्रकाश खुटेमाटे, दिवाकर भोंगळे, अमोल रेगुंडवार, सचिन मोहीतकर, भाऊराव जुनघरी, प्रा.देशपांडे यांची उपस्थिती होती.
अॅड. चटप यांनी प्रा. डहाके यांच्या साहित्यनिर्मितीचा आढावा घेतला. बेलोरा गावातील अनेक नागरिक आज उच्च पदावर पोहोचले असून त्यातील काही परदेशातही सेवारत आहेत. या गावातील नागरिकांनी राष्ट्रसंताची शिकवण आचरणात आणल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
संचालन अविनाश पोईनकर यांनी तर आभार रत्नाकर चटप यांनी मानले. प्रा. अजय देशपांडे यांनी प्रा. डहाके यांच्या साहित्य निर्मितीचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल शिरपूरकर, राजेंद्र घोटकर, राजू राखूंडे, जगदीश भोंगळे, प्रमोद जुनघरी, विद्या जुनघरी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)