घुग्घुस रेल्वे ओव्हर ब्रिजला हिरवी झेंडी
By admin | Published: February 5, 2017 12:32 AM2017-02-05T00:32:40+5:302017-02-05T00:32:40+5:30
घुग्घुस - ताडाळी रेल्वे मार्गावर रेल्वे ओव्हर ब्रिज बबनविण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येत होती.
घुग्घुस : घुग्घुस - ताडाळी रेल्वे मार्गावर रेल्वे ओव्हर ब्रिज बबनविण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येत होती. उशिरा का होईना आज चंद्रपूर - घुग्घुस -वणी महामार्गावरील येथील राजीव रतन दवाखान्यानजीक १६.५० कोटी तर विमला सायडींग रेल्वे मार्गावर १५ कोटी अशा दोन ठिकाणी ओव्हर ब्रिजला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
चंद्रपूर - घुग्घुस -वणी महामार्गावरील येथील राजीव रतन दवाखान्यानजीक घुग्घुस - ताडाळी रेल्वे मार्गावरून कोळसा, सिमेंटची रेल्वेच्या २० ते २५ रॅकची वाहतूक रात्रंदिवस मागील अनेक वर्षापासून होत आहे. चंद्रपूर - घुग्घुस -वणी महामार्गावरून यवतमाळ मुंबईकडे दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते.
रेल्वेच्या ये-जा करणाऱ्या रॅकमुळे रेल्वे गेट १५-२० मिनिटे बंद राहत असल्याने महामार्गावरील वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अर्धा-अर्धा तास लागत असते. त्या दरम्यान गंभीर रूग्णाला घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिका, शाळकरी मुलांना स्कूल बस असूनही शाळेत वेळेवर पोहचता येत नाही, कामगारवर्गांनाही रेल्वे गेटचा फटका बसत आहे.
घुग्घुस - ताडाळी रेल्वे लाईनवर राजीव रतननजीकच्या रेल्वे गेटवर ओव्हर ब्रिज बनविण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून राज्यात, केंद्रात काँग्रेसचे शासन असतानापासून केली जात होती. पाठपुरावाही सातत्याने सुरू होता. भाजपची राज्यात, केंद्रात सरकार आल्यानंतर येथील भाजप जेष्ठ कार्यकर्ते संजय तिवारी यांनी हा प्रश्न केंद्रीय गृह राजमंत्री व या क्षेत्राचे खा. हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेटून धरला तर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीदेखील वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा केला. दरम्यान आज शनिवारी केंद्राने घुग्घुस - ताडाळी रेल्वे लाईनवर राजीव रतन नजीकच्या रेल्वे गेटवर ओव्हर ब्रिज बनविण्याकरिता मंजुरी दिली आहे. (वार्ताहर)