महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:53 PM2017-12-06T23:53:13+5:302017-12-06T23:53:51+5:30
‘बाबासाहेब अमर रहे’, ‘युध्द नको बुध्द हवा, सुख शांतीचा मार्ग नवा’ आदी घोषणा देत हजारो आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ‘बाबासाहेब अमर रहे’, ‘युध्द नको बुध्द हवा, सुख शांतीचा मार्ग नवा’ आदी घोषणा देत हजारो आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्तकोतर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाची यात्रा काढण्यात आली. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून निघालेली ही यात्रा कस्तुरबा मार्गाने गिरनार चौक, गांधी चौक येथून मार्गक्रमण करून डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचली. तिथे बाबासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
त्यानंतर शहरातील विविध भागातून आंबेडकरी अनुयायी रॅलीच्या रुपात डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ पोहचले. रॅलीतील प्रत्येक आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेऊन अभिवादन करीत होता. विविध संघटनांकडून पुतळ्याला मालार्पण केल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
दुर्गापुरातून निघाली महारॅली
पंचशील बौध्द विहार, भीमनगर, वॉर्ड क्रमांक ४, दुर्गापूर अंतर्गत बुधवारी संयुक्त रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये उर्जानगर वसाहत, डब्ल्यु.सी.एल. शक्तीनगर, दुर्गापूर, तुकुम, सिनाळा, मसाळा, वरवट, चोरगांव, पदमापूर, किटाळी, भटाळी, पायली, विचोडा, खैरगाव या सर्व ग्रामीण भागातील एकुण ७० बौध्द मंडळे व सामाजिक संघटनांचा सहभाग होता. सदर रॅलीची सुरूवात खुलेरंगमंच, उर्जानगर वसाहतीतून करण्यात आली. मुख्य मार्गाने जटपुरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचली.
काँग्रेसतर्फे आदरांजली
काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकूळकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, देवेंद्र बेले, संगिता भोयर, प्रवीण पडवेकर, चंद्रशेखर पोडे आदी उपस्थित होते.