महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:25 PM2018-04-14T22:25:35+5:302018-04-14T22:25:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने चंद्रपुरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायांनी व इतर समाजातील नागरिकांनी आपल्या लाडक्या महामानवाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने चंद्रपुरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायांनी व इतर समाजातील नागरिकांनी आपल्या लाडक्या महामानवाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी शहरात उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासून शहरातील वॉर्डावॉर्डातून पांढरे वस्त्र परिधान करून आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याकडे निघाले. सकाळी ८ वाजतापासूनच अनुयायी बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत होते.
सकाळी १० वाजता मुख्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते. यावेळी सामूहिक बुध्दवंदनाही घेण्यात आली.त्यानंतर रात्री वॉर्डावॉर्डातही बुध्द वंदना घेऊन सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध पक्षांकडून अभिवादन
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटी, भाजपा, शिवसेना, भारिप, बहुजन समाज पार्टी यासह विविध राजकीय पक्षांकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठिकठिकाणी सरबत, महाप्रसादाचे वितरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने सरबत वितरण व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा अनेक नागरिकांनी आस्वाद घेतला.
ग्रामीण भागातही कार्यक्रम
चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात, शाळा-महाविद्यालयात, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय जिल्ह्यात कोरपना, गडचांदूर, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्र्यांनी केले अभिवादन
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांनी शनिवारी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.