जिवतीवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:22 PM2019-07-01T22:22:33+5:302019-07-01T22:22:48+5:30
जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिवतीसाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शहराच्या बाहेर विहीर आहे. या विहिरीत सध्या तलावातील पाणी नालीद्वारे सोडण्यात येत आहे. ज्या नालीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. ती नाली पूर्णत: उघडी असून या नालीत मृत जनावरांचे मृतदेह आढळून आले आहे. एवढेच नाही तर अनेक जनावरे या नालीतून ये जा करतात. नालीत बसतात आणि याच नालीतून तलावातील गढूळ पाणी विहिरीत सोडले जाते आणि नंतर विहिरीतून नळाद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. मात्र नागरिकांपर्यंत येत असलेले पाणी पूर्णत: गढूळ असून ते पाणी नागरिकांना वापरण्यायोग्य नाही. या दूषित पाण्याने अनेकांना शरिराला खाज सुटली आहे. ही बाब अनेकांनी नगर पंचायतीला लक्षात आणून दिली असली तरी याकडे नगरपंचायतिचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
ज्या नालीतून पाणीपुरवठा केला जात आहे, त्या नालीत चक्क जनावर मरून आहे. ही बाब न. प. च्या लक्षात का येत नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
विकासाची भाषा करणारे नगरसेवक लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत तर या दूषित पाण्याने अनेकांना खाज सुटली असून दवाखान्यात दाखवावे लागत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहरात केवळ दूषित पाणी पुरवठाच नाही तर अनेक वार्डात रस्ते नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी जागोजागी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू असून नाल्याअभावी पाणी वार्डातच साचून असते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वार्डात पाणी साचून असल्याने लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.
जिवती शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे, ही शोकांतिका आहे. अनेकदा सांगूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात अनेक समस्या असून त्या समस्या सोडविण्यात नगरपंचायतीला अपयश आले आहे.
-विकास डसाने, नागरिक, जिवती
नळयोजनेद्वारे येत असलेले पाणी पूर्णत: खराब येत असून मला या दूषित पाण्याने खूप खाज सुटली. शेवटी मला दवाखान्यात जावे लागले. ही बाब न. प. ला लक्षात आणून दिली. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे
- राजू जाधव, नागरिक, जिवती