गटशेतीने उत्पादन वाढीचा प्रयत्न
By admin | Published: May 15, 2014 01:01 AM2014-05-15T01:01:30+5:302014-05-15T01:01:30+5:30
शेतीसाठी उपयुक्त यंत्र सामुग्री प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे शक्य होत नाही किंवा शासनाला यावर अनुदान देणेसुध्दा परवडत नसल्याने ..
गडचिरोली : शेतीसाठी उपयुक्त यंत्र सामुग्री प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे शक्य होत नाही किंवा शासनाला यावर अनुदान देणेसुध्दा परवडत नसल्याने जिल्ह्यात २0 ते ३0 नागरिकांचे गट तयार करून या गटांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री पुरविली जात आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. एकूण उत्पादनाच्या सुमारे ८0 टक्के वाटा धान उत्पादनाचा आहे. मात्र येथील शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री खरेदी करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर धान लागवडीची आधुनिक पध्दत शेतकर्यांना माहित नाही. धान पिकाची रोवणी, निंदन, कापणी व मळणीसाठी मोठय़ा प्रमाणात मजुरांची गरज भासते. धान पिकाच्या रोवणीच्या कामाला एकाच वेळी सुरूवात होत असल्याने या कालावधीत मजूर मिळणे कठीण होते. बर्याचदा धानाची लागवड उशिरा होत असल्याने धान उत्पादनात कमालीची घट होत असल्याचा शेतकर्यांचा अनुभव आहे.
या सर्व अडचणींचा विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २0 ते ३0 नागरिकांचा एक गट तयार केला आहे. या गटाला पावर टिलर, भात रोवणी यंत्र, कापणी यंत्र, निंदनासाठी कोनो रिडर, युरीया ब्रिकेट तयार करणारी मशीन आदी यंत्रे अनुदानावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वगळता ११ ही तालुके मानव विकास मिशनमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत. या तालुक्यातील नागरिकांना मानव विकास मिशनच्या निधीतून यंत्र सामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंत शेतकर्यांचे एकूण ३७ गट तयार करण्यात आले आहेत. याच बरोबरच आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने शेतकर्यांचे २२ वेगळे गटसुध्दा बनविण्यात आले आहेत.
यंत्र कसे चालवावे, त्याची काळजी कशी घ्यावी, मॅट नर्सरीचे प्रशिक्षण, आधुनिक पध्दतीने शेती आदी विषयी जवळपास ७0 शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)