डास वाढल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:15+5:302021-01-21T04:26:15+5:30
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. ...
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. याचवेळी शहरातील काही भागांमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वच्छतेसह धूरफवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे काही भागात फवारणी केली जात असली, तरी ती केवळ नावापुरतीच आहे.
जिवतीतील समस्या अद्यापही कायमच
जिवती : दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील समस्या अद्यापही कायम आहेत. या समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी नागरी समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
घरकुुलासाठी नागरिकांना प्रतीक्षा
चंद्रपूर : दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविण्यात येते. गरजू लाभार्थ्यांना अद्यापही घरकुल मिळालेले नाही. त्यामुळे नव्याने याद्या तयार करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने घाणीचे साम्राज्य कायम आहे.
वीज देयकात सूट देण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील वीज उत्पादन प्रकल्पामुळे वायू, ध्वनी व जल प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानिर्मितीने उपाययोजना करायला हवी होती. परंतु, त्यांनी काहीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला आजारांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कोरोना संकट काळात वीजबिल माफ करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. मात्र, वीज देयकात सूट देण्यात आलेली नाही.
मोकाट जनावरांचा बसस्थानकावर ठिय्या
गडचांदूर : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसून राहतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरही हाच प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दूरसंचार सेवा सुरळीत करावी
घुग्घूस : भारतीय दूरसंचार विभागाकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ढिसाळ सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. खासगी कंपन्यांनी हातपाय पसरले तरी आजही हजारो ग्राहक दूरसंचारकडून सेवा घेतात. मात्र, इंटरनेट वारंवार बंद होत असल्याने व्यापारीही हैराण झाले आहेत.