चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला वाढता विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:42+5:302021-02-09T04:30:42+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व गावांचा चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसे पत्रसुद्धा जिल्हाधिकारी यांनी दि.२९ जानेवारी ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व गावांचा चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसे पत्रसुद्धा जिल्हाधिकारी यांनी दि.२९ जानेवारी २०२१ रोजी जारी करून १५ दिवसांत आक्षेप मागविले होते. याची तातडीने दखल घेऊन चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करू नये, या मागणीसाठी गंगाबाई तलमले कॉलेज येथे प्रा. बजाज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय व विविध संघटना व जनतेच्या वतीने महत्त्वाची बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर प्रा. डाॅ. देवीदास जगनाडे, चोले, बोराडे व डाॅ. प्रेमलाल मेश्राम उपस्थित होते. यावेळी चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रह्मपुरी तालुक्याच्या समावेश करण्यास सर्वांनी स्पष्ट नकार देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करण्यासाठी ब्रह्मपुरीकरांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवावा, असेही ठरविण्यात आले. यामुळे चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय अडचणीत येते की काय, असे एकंदर चित्र निर्माण होण्याचेच हे संकेत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही नागभिडातून अशाच प्रकारचा सूर उमटला होता. हे विशेष. बैठकीचे सूत्रसंचालन विनोद झोडगे यांनी, तर प्रास्ताविक सुधीर सेलोकर यांनी केले. बैठकीस विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.