बंदर कोळसा ब्लॉकला पर्यावरण संघटनांचा वाढता विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:53+5:30

ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉक परिसर वाघासह इतर प्राण्यांचा कॉरिडॉर आहे याच मार्गाने बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरूंद आहे. कोळसा खाणीला मंजुरी दिल्याने उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतरणाला अडथळे निर्माण होणार आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.

Growing opposition from environmental organizations to the port coal block | बंदर कोळसा ब्लॉकला पर्यावरण संघटनांचा वाढता विरोध

बंदर कोळसा ब्लॉकला पर्यावरण संघटनांचा वाढता विरोध

googlenewsNext
ठळक मुद्दे वाघांच्या अस्तिवाला धोका : स्थलांतरण बंद झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : केंद्र सरकारने देशातील ४१ कोळसा ब्लॉकसह ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकच्या लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अस्तित्वासह अन्य वन्यप्राण्यांचे कॉरिडॉर उद्धवस्त होण्याचा धोका असल्याने जिल्ह्यातील पर्यावरण संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून कोळसा ब्लॉक लिलावाला विरोध दर्शविला आहे.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉक परिसर वाघासह इतर प्राण्यांचा कॉरिडॉर आहे याच मार्गाने बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरूंद आहे.
कोळसा खाणीला मंजुरी दिल्याने उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतरणाला अडथळे निर्माण होणार आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.
त्यामुळे केंद्राने मंजूर केलेला बंदर कोळसा ब्लॉक रद्द करण्यासाठी चंद्र्रपूर येथील इको-प्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुक्यातील पर्यावरणवादी व वन्यजीव प्रेमींच्या उपस्थितीत ताडोबाच्या वाघाच्या कॉरिडॉर असलेल्या बंदर ते शेडेगाव मार्गावर ‘बंदर कोल ब्लॉक गो बॅक, सेव्ह टायगर’ अशा घोषणा देऊन दोन तास प्रदर्शन केले.
आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्पही जाहीर करण्यात आला. यावेळी शंकरपूर येथील पर्यावरणवादी मंडळाचे आमोद गौरकार, वीरेंद्र हिंगे, पर्यावरण संघटनेचे कवडू लोहकरे, ताडोबा मित्रचे इम्रान कुरेशी, पंचायत समितीचे सदस्य अजहर शेख, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, बंदरचे माजी सरपंच बंडू तराळे, बाबा ननावरे आदी उपस्थित होते.

पर्यावरणमंत्र्यांच्या पत्राने आंदोलनात बळ
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छायाचित्राच्या छंदापोटी कुटुंबासह ताडोबातील पर्यटनासाठी यायचे. दोन-तीन दिवस मुक्कामी करायचे. बालपणी कधीकाळी वडीलांसोबत आलेले आदित्य यांना ताडोबातील वाघ व वन्यजीवसंपदेने भुरळ घातली. त्यामुळे ताडोबातील वाघाच्या रक्षणासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून बंदर कोल ब्लॉक रद्द करण्याची मागणी केली. या पत्रामुळे पर्यावरण संघटनांना बळ मिळाले आहे.

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रात लागून असलेल्या बंदर कोल ब्लॉक कोल लिलाव करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरूद्ध रक्षण धरणीमातेचे या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी माना टेकडी परिसरात वृक्षारोपण करून निदर्शन केले. व्याघ्र भ्रमण मार्ग नष्ट झाल्यास मानव- वन्यजीव संघर्ष वाढेल. त्यामुळे हा लिलाव रद्द करण्याची मागणी संघटनेने केली. आंदोलनात रश्मी कोटकर, पूजा करमरकर, अश्विनी कावळे, कपिल नवघडे, माधुरी शेंडे, राजू शेंडे, श्रेयस शेंडे, सुरज बजाज, ऋचा बजाज, अमोल बैस, यशोधन वाडेकर, वाडेकर, हर्षल टिपले, रोशनी टिपले, काव्या बैस ,विजय मोरे, महावीर मंत्री, अविनाश लेनगुर,भूषण सोनकुसरे, सचिन साळवे ,आशिष भरडकर, राजू पिसे, अनिता पिसे, राहुल कोटकर सहभागी झाले होते.

Web Title: Growing opposition from environmental organizations to the port coal block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.