वृक्षारोपणासाठी रोपांनी फुलल्या रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:46 PM2019-05-27T22:46:05+5:302019-05-27T22:46:41+5:30
राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील रोपवाटिकेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक एस.एस. करे, वनपरिक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार, वनरक्षक मत्ते, रोपवाटिका देखरेख करणारे राजेश माडूरवार यांच्या परिश्रमातून वढोली रोवाटिकेत सुमारे ३ लाख १० हजार रोपांची रोपवाटिका फुलली आहे. यासाठी सामाजिक वनिकरण विभाग वढोली परिक्षेत्राचे वनरक्षक मत्ते यांनी रोपवाटिकेत ३ लाख १० हजार रोपांचे सवर्धन केले आहे. यामध्ये २५ वेगवेगळ्या जातीचे रोपे आहेत. साग,बांबू,शिसू, कुसुम, गुलमोहर, कडुलिंब, निलगिरी, शिवन, करंज यासह १३ विविध प्रकारची फळझाडेदेखील आहेत. संपूर्ण रोपवाटिका हिरव्यागार रोपांनी नटली आहे. १ जुलैपासून राज्यात होणाऱ्या ऐतिहासिक वृक्ष लागवड उपक्रमात ही रोपे तालुक्यातील ग्रामपंचायतींना वितरित केल्या जाणार आहे. उर्वरित रोपांची वनकन्या समृधी योजना, रानमाळा व विविध योजनेअंतर्गत विविध भागात लागवड केली जाणार असल्याची माहिती वनरक्षक मत्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जुलै महिन्याच्या प्रारंभापासून सुरू होणाऱ्या वृक्षरोपणाच्या या महामोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. काळाची पावले ओळखून ही मोहीम राबवली जात आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.