जीएसटीमुळे सराफा बाजारपेठ मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:23 PM2017-12-22T23:23:51+5:302017-12-22T23:25:23+5:30
पूर्वी वॅट करप्रणाली होती. १.२० टक्के वॅट देताना ग्राहकांनाही फारसे जड जात नव्हते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : पूर्वी वॅट करप्रणाली होती. १.२० टक्के वॅट देताना ग्राहकांनाही फारसे जड जात नव्हते. मात्र आता ३ टक्के जीएसटी लागत असल्याने व्यवसाय करताना फार अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहक झपाट्याने दूर चालला आहे. सराफा बाजारपेठ मंदावली आहे, अशी व्यथा चंद्रपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली.
‘लोकमत व्यासपीठ’ या सदराखाली सराफा व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी चंद्रपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाºयांना ‘लोकमत’ने पाचारण केले होते. या व्यासपीठावर बोलताना सराफा व्यावसायिकांनी सरकारच्या व्यापारी धोरणावर कडाडून टिका केली. यावेळी सराफा असोसिएशनचे सदस्य संजय सराफ म्हणाले, सरकारने मागील दिवाळीनंतर नोटबंदी केली. हा निर्णय अचानक आणि व्यापारपेठेत उलथापालथ करणारा होता. या नोटबंदीचा सराफा व्यवसायावरही परिणाम झाला. काही दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. नोटबंदीचा हा परिणाम दीर्घकालीन नव्हता. सराफा मार्केटमध्ये रेलचेल वाढली. मात्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर सराफा व्यवसायात दूरगामी परिणाम झाला आहे. सोने-चांदी खरेदी करणाºया ग्राहकांवर आर्थिक बोझा पडत असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी म्हणाले, सरकार एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा करीत आहे. सर्व व्यवहार डिजिटल करीत आहे. मात्र दुसरीकडे यातूनही नागरिक व व्यापाऱ्यांचीच आर्थिक लूट करीत आहे. सोने खरेदी केल्यानंतर डेबीट कॉर्डद्वारे ग्राहकांनी पैसे दिल्यानंतर त्यातही १.२० टक्के जीएसटी कपात केली जाते. डेबीट कॉर्डद्वारे व्यवहार करण्यावर शासन भर देत आहे तर या व्यवहारावर कुठलाही कर लादू नये, असेही ते म्हणाले. महाराष्टÑ सराफा महामंडळाचे उपाध्यक्ष राजेंद लोहा म्हणाले, चंद्रपूर शहरात ७० तर जिल्ह्यात २०० सराफा व्यापारी आहेत. अडीचशेच्या जवळपास कारागिर आहेत. या सर्वांच्या व्यवसायावर जीएसटीमुळे अवकळा आली आहे. जीएसटी लागू झाल्यापासून ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाला आहे.
पुन्हा जीएसटी वाढण्याचे संकेत
सोने खरेदीत सध्या १० टक्के एक्साईज कर घेतला जातो. त्यानंतर ३ टक्के जीएसटीही लागते. आता सरकार एक्साईज कर कमी करून पुन्हा जीएसटी ३ टक्क्यावरून ५ टक्के करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. असे झाले तर ग्राहकांवर पुन्हा आर्थिक बोझा पडेल. एक्साईज कर ग्राहकांना दिसून येत नाही. मात्र जीएसटी ग्राहकांना दिसून येते. त्यामुळे ग्राहक सोने खरेदीपासून परावृत्त होतील, अशी भीतीही संजय सराफ आणि राजेंद्र लोहा यांनी व्यक्त केली.
सरकारच्या धोरणामुळे सराफा व्यवसायावर अवकळा आली आहे. कधीकधी तर सकाळपासून दुकान उघडल्यानंतर सायंकाळी पहिला ग्राहक मिळतो. कारागिरांवरही वाईट दिवस आले आहे. चार-पाच दिवसानंतर कारागिरांना एखादे काम मिळते.
-सत्यम सोनी,
अध्यक्ष, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूर
शासनाने जीएसटी करप्रणाली लागू करून सराफा व्यावसायिकांवर अन्यायच केला आहे. दहा हजारांचे सोने खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ९०० रुपये जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे ग्राहक सोने खरेदीस धजावत नाही. शासनाने जीएसटी घ्यावा. मात्र तो दोन टक्क्यांहून अधिक घेऊ नये. आणि डिजिटल व्यवहारावर कोणताही कर लादू नये.
-राजेंद्र लोहा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफा महामंडळ.
सोने-चांदी चोरीसाठी कायद्यात ४११ कलम आहे. या कलमान्वये एखाद्या चोरट्याने एखाद्या सराफा व्यावसायिकाकडे ‘सोने येथे विकले’ असे म्हणत बोट दाखविले तर त्या व्यावसायिकाला अटक केली जाते. अनेकवेळा चोर खोटे बोलत असतो. मात्र व्यावसायिकाला त्याचा खोटारडेपणा सिध्द करता येत नाही. या कलममुळे व्यावसायिकात भीती निर्माण झाली आहे. यामुळे जो गरीब आहे, अडचणीत आहे, त्यालाही सोने देऊन मदत मिळू शकत नाही.
-संजय सराफ,
सदस्य, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूर.
पूर्वी लहान व्यापारी आनंदीत होते. समाधानी होते. मात्र आता जीएसटीमुळे त्यांचा व्यवसाय चौपट झाला आहे. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करून ठेवणेही ग्राहकांनी कमी केले आहे. कार्पोरेट शो रुममुळे फॅन्सी दागिन्यांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
-देवेंद्र मांडविया,
सदस्य, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूर.