...अन् पालकमंत्र्यांनी बघितला चक्क काळा कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 05:00 AM2022-01-08T05:00:00+5:302022-01-08T05:00:39+5:30
उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यातील उद्योगांकडून होणाऱ्या जीवघेण्या प्रदूषणाने अस्वस्थ आहेत. अखेर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चार दिवसांपासून मुक्कामी असलेल्या पालकमंत्र्यांनी शुक्रवारी यंत्रणेच्या ध्यानीमनी नसताना आपला ताफा थेट ताडाळी एमआयडीसीकडे वळविला. येरूर शिवारातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केला असता शेतात काळा कापूस दिसला. त्यावरील धूळ निरखून बघितली आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन प्रदूषण ओकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी नीलेश तायवाडे, वेस्टर्न कोल फिल्डचे गुप्ता यांच्यासह चमन मेटॅलिक, ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी स्टील, विमला इन्फ्रास्टक्चर आदी उपस्थित होते.
या कापसाला कोण भाव देणार?
- काळा पडलेल्या कापसाला बाजारभावाच्या ५० टक्केसुद्धा भाव मिळत नाही. एकतर या कंपन्यांनी स्थानिकांना अत्यल्प रोजगार दिला आणि नागरिकांच्या शेती व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सोबतच नागरिकांना डोळ्यांचे आजार, कॅन्सर, दमा, हृदयरोग यासारखे रोग दिले आहेत. जनावरेसुद्धा आजारी पडत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी नमूद केले.
गावकरी भरभरून बोलले, उद्योगांची केली पोलखोल
पालकमंत्र्यांनी शेतकरी प्रदीप जोगी आणि गुणवंत चंदनखेडे यांच्या शेतातील कापूस अक्षरश: काळा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी गावकऱ्यांनी मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. काळ्या पडलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्यावर कंपन्या पाणी मारत नाही. प्रदूषणाचे धूलिकण नागरिकांच्या शरीरात जातात. अशा कंपन्यांविरोधात सक्त कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी प्रकाश देवतळे, रामू तिवारी, येरूरचे सरपंच मनोज आमटे, माजी पंचायत समिती सभापती विजय बलकी, नकोडाच्या ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे, विद्या डांगे, मधुकर बरडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.