प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन

By राजेश भोजेकर | Published: September 18, 2023 11:49 AM2023-09-18T11:49:02+5:302023-09-18T11:49:32+5:30

Chandrapur: आरोग्याची वेळेवर तपासणी होणे गरजेचे असून, जिल्ह्यात सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार  यंत्रणेचे जाळे उभे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Guardian Minister Sudhir Mungantiwar assured that a system will be set up so that everyone will get better health facilities | प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन

प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन

googlenewsNext

- राजेश भोजेकर
चंद्रपूर : उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वांत मोठी संपत्ती आहे; तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे ; परंतु पैसा कमविताना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत ही वस्तुस्थिती आहे. आरोग्याची वेळेवर तपासणी होणे गरजेचे असून, जिल्ह्यात सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार  यंत्रणेचे जाळे उभे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘आयुष्यमान भव’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. या कार्यक्रमात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे  संवाद साधला. तत्पूर्वी राष्ट्रीय स्तरावर देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मा. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, परिविक्षाधीन आयएएस रणजीत यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अंजली घोटेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

‘आयुष्यमान भारत’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘या योजनेंतर्गत देशातील ५० कोटी नागरिकांना आरोग्याचे विमा कवच प्राप्त झाले आहे. तर राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचाराची मर्यादा दीड लक्ष रुपयांवरून पाच लक्ष रुपये केली आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा उत्तमोत्तम राहावा, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईश्वरीय सेवा म्हणून कार्य करावे. जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, संसाधने, औषधे आदींसाठी एक रुपयाही कमी पडणार नाही.’ ‘इतर शासकीय विभाग भौतिकदृष्ट्या संपन्न असू शकतात, मात्र आरोग्य विभाग हा लोकांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता ‘हॉस्पीटल ऑन व्हील’ सुरू करण्याचे नियोजन आहे. आयुष्मान भारत कार्ड वाटप संदर्भात जिल्हाधिका-यांनी एक समिती गठीत करावी. याअंतर्गत कॉल सेंटर, आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्यमित्र आदींमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर असावा. यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन आणि सामाजिक संघटनांची मदत घ्यावी, अशा सुचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. कार्यक्रमाचे संचालन योगिता आंबेकर यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी मानले. 

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे जाळे
एम्सच्या धर्तीवर चंद्रपुरात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार होत आहे. तसेच कॅन्सर हॉस्पीटलकरीता उद्योगपती रतन टाटा यांनी १०० कोटी रुपये दिले आहेत. सोबतच येथील कॅन्सर हॉस्पीटलला मदत करण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलचे सहकार्य लाभत आहे. बल्लारपूर येथे कामगारांसाठी १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तयार होत आहे. तसेच १०० खाटांचे स्त्री रुग्णालयसुध्दा लवकरच कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्तापूर्वक व दर्जेदार व्हावे, यासाठी नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या सेवेत रुजू झाले असून मूल येथे ५ एकरमध्ये १०० खाटांचे सुसज्ज हॉस्पीटल उत्तम बांधण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

आशा स्वयंसेविकांचे कार्य उत्तम
आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य व्यवस्थेच्या महत्वाच्या घटक आहेत. त्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्यात येत आहे. आशा स्वयंसेविकांचे काम उत्तम असून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी त्या कार्यरत असतात, अशी कौतुकाची थाप पालकमंत्र्यांनी दिली.

उत्तम आरोग्यासाठी क्रीडा सुविधा
आरोग्य बिघडू नये यासाठी रोज योगा व व्यायाम करणे तसेच खेळ खेळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात सुसज्ज क्रीडांगणे, आणि क्रीडा विषयक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. राज्यात केवळ चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून व्यायाम व खेळामुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

तत्पूर्वी लाभार्थ्यांना 5 लक्ष रुपयांपर्यंत विमा कवच असलेले आभा गोल्डन कार्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात माधव आत्राम, रामचंद्र लक्ष्मण, अनिता रामचंद्र, शंकर कन्नूर, लक्ष्मी आत्राम यांचा समावेश होता. सिकलसेल प्रमाणपत्र जयंती दिवटे, सुचिका उपरे आणि आरोही उईके यांना तर प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान निक्षय मित्र प्रमाणपत्र इनरव्हील क्लब, चंद्रपूर आणि गणपतराव पाझारे बहुउद्देशीय संस्था यांना तर टी.बी. चॅम्पियन प्रमाणपत्र योगिता मिश्रा यांना देण्यात आला.

Web Title: Guardian Minister Sudhir Mungantiwar assured that a system will be set up so that everyone will get better health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.