ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 01:13 AM2016-07-09T01:13:52+5:302016-07-09T01:13:52+5:30
तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमधील अनियमिततेविरोधात तक्रार करण्यात आली होती.
कढोली ग्रामपंचायत : चौकशी अहवाल दडपला
भद्रावती : तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमधील अनियमिततेविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी होऊन पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी भद्रावतीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भद्रावतीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे कोंढा येथील अशोक लिपटे यांनी कढोलीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. कढोलीचे ग्रामविकास अधिकारी डुकरे आपल्या कार्यालयात अनियमित असतात ते कार्यालयात न आल्याबाबत लिपटे यांनी विचारणा केली तर अपशब्दात अरेरावीची भाषा वापरली. ग्रामपंचायत कार्यालयात आपली कामे घेऊन ४-४ किलोमटर अंतरावरील लोक येत असतात. पण डुकरे उपस्थित नसल्याने त्यांना हात हलवित परत जावे लागते.
डुकरे यांनी नवीन हायवे ते कढोली पांदण रस्त्याची निविदा न काढता स्वत: काम करून घेतले. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कढोली येथे २०१० ते २०१५ या पाच वर्षात किती निधी प्राप्त झाला, किलोनी, कुरूडा, बोलथाळा येथे किती झाडे लावली, वृक्षारोपणावर किती खर्च झाला आदीची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कोंढा ग्रामपंचायतमधील वॉर्ड क्र. ३ येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची निविदा कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आली, त्यासाठी किती निधी प्राप्त झाला व किती शिल्लक आहे, अशी मागणीही करण्यात आली. त्याचा पाठपुरावा लिपटे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केला. त्यावरून कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांनी आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)