झोपडपट्टीधारकांना पालकमंत्र्यांचा दिलासा
By admin | Published: June 13, 2017 12:30 AM2017-06-13T00:30:58+5:302017-06-13T00:30:58+5:30
येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीधारकांची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेवून काळजी करु नका, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीधारकांची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेवून काळजी करु नका, खोलीकरणाची माती झोपडपट्टी बसलेल्या ठिकाणी टाकू देणार नाही, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करु, असे आश्वासन दिले. यामुळे झोपडपट्टीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूल येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या खुल्या जागेवर काही गरीब व गरजू नागरिक झोपड्या बांधून राहत आहेत. याठिकाणी पाटबंधारे विभागाने तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. तलाव खोलीकरणाच्या कामातून निघालेली माती झोपडपट्टीधारकांच्या घराला लागून टाकण्यात येत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून झोपडपट्टीधारकांची समस्या कायम दूर करण्याची मागणी केली होती.
राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मूल येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी ना. मुनगंटीवार मूल मध्ये आल्यानंतर शहरातील भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पाडले व रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झोपडपट्टीधारकांची भेट घेतली. त्यांनी यावेळी झोपडपट्टीधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी मुनगंटीवार यांनी काळजी करु नका, यापुढे पाटबंधारे विभाग या ठिकाणी माती टाकणार नाही. माती टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करु, असे अश्वासन दिले. झोपडपट्टीधारकांनी यावेळी ना. मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमाला आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पारधी, भावेश गोहणे, पंकज गोहणे, प्रशांत इमलवार, मधूकर मोहुर्ले, नितेश कावळे, निलेश बुटले आदी उपस्थित होते.