गुणवत्तावाढीसाठी आता पालक अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:22 AM2019-08-19T00:22:57+5:302019-08-19T00:23:27+5:30
समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे.
प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने समग्र शिक्षा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यास गुणवत्तेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदचे प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी यासंबंधीचे आदेश नुकतेच काढले आहेत.
चंद्रपूरसाठी अभियंता नंदू बोरसे हे पालक अधिकारी आहेत. पायाभूत शैक्षणिक सुविधा व शाळांच्या समृद्धीसाठी समग्र शिक्षा अभियान राबवले जात आहे. याच्या माध्यमातून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे शिक्षकांच्या ज्ञानकक्षा समृद्ध व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. राज्यभरात जिल्हानिहाय पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यात सहसंचालक, प्रकल्प उपसंचालक, मुख्य अभियंता, उपअभियंता, सहायक संचालक, लेखाधिकारी, कार्यक्रम अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
‘शगून’ आॅनलाईन पोर्टल विकसित
जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य, तेथील कामाची प्रगती, समन्वय व सनियंत्रणासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर ते दरमहा काही शाळांची माहिती राज्य सरकारला पाठवणार आहेत. भारत सरकारकडून विविध उपक्रमांच्या यशस्वितेसाठी उपयोग व्हावा म्हणून ‘शगून’ हे आॅनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालक अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातून शैक्षणिक विषयावरील पाच व्हिडीओ (इंग्लिश सब-टाईटल), केस स्टडीज, स्टेटेमोनियल ई-मेलवर पाठविण्याच्या सूचना आहेत
शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभियंता नंदू बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसह शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे.
-दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर