गुढी पाडव्याच्या रॅलीने वरोरा शहर दुमदुमले
By admin | Published: March 29, 2017 02:00 AM2017-03-29T02:00:42+5:302017-03-29T02:00:42+5:30
मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी वरोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ढोल-ताशांचा गजर : आदिवासींच्या नृत्याने लक्ष वेधले
वरोरा : मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी वरोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वरोरा शहरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमधील मनमोहक दृश्य बघण्यास रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी उसळली होती.
गुढी पाडवा अशा आगळ्यावेगळ्या स्वरुपात साजरा करण्याकरिता महात्मा गांधी उद्यान योग मंडळाने पुढाकार घेतला. यामध्ये वरोरा शहरवासीय मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवितात. आज सकाळी महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी रॅलीमध्ये काही महिला बुलेट दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीची समाप्ती झाल्यानंतर वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यात यावर्षी प्रथमच कल्पतरु सोशल मंडळ वरोराने आपले बँड पथक तयार करुन रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीमध्ये चंद्रपूर येथील मल्लखांब प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
चिमूरचे आदिवासी नृत्य, यवतमाळचे ढोल पथक, सातऱ्याचा दांडपट्टा, वरोऱ्याचे लेझीम पथक, महिला भजन मंडळे सहभागी झाले होते. रॅलीत मल्लखांब ढोल पथक, दांड पट्टा, आदिवासी नृत्य सर्वांंचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीमधील सहभागी असलेल्या पथकाच्या सदस्यांना वरोरा शहरातील सामाजिक संस्था, समाज मंडळे, क्रीडा संघटना आदींनी ठिकठिकाणी थंड पाणी शरबत, आदी शित पेयाची व्यवस्था केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील तलावाच्या प्रवेश द्वारावरची रोषनाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (तालुका प्रतिनिधी)