जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:39 PM2018-10-14T22:39:41+5:302018-10-14T22:40:02+5:30
जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे.
फारूख शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे.
तालुक्यातील चिखली बिट, देवाडा बिट, शेणगाव बिट व पाटण बिटातून, तुमडीगुडा, रेगागुडा, चिखली, नाईक नगर, पुन्नागुडा, गणेरी, पाटन, हिरापूर, गोदापूर, नंदप्पा, सगणापूर, आंबेझरी, पल्लेझरी, शेनगाव, ताडीहिरापूर परिसरातील शेतातील व जंगलातील गारगोटी बाल मजूर लावून १७ किलो रुपये या प्रमाणे घेवून ते पाटण, शेनगाव, भेंडवी, गडचांदूर या मार्गाने अवैध वाहतूक करुन ते जयपूर, औरंगाबाद येथे पोहचविल्या जात आहे.
याकडे मात्र वन कर्मचारी व अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. सोनापूर, भेंडवी येथे वनविभागाचे चेक पोस्ट आहे. मात्र हजारो टन गारगोटीची वाहतूक होत असतानाही कधीच कारवाई केली जात नसल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत. आता त्यांनीच या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर आळा घालण्याची माणगी आहे.
बालकामगारांचा समावेश
अवैध गारगोट्यांची शेतातून व जंगलातून उचल करण्यासाठी बाल कामगारांचा वापर सुरु आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थी शाळा सोडून या कामात दिवस रात्र गुंतले आहेत. ही बालमजूर कायद्याची पायमल्ली आहे.
तेलंगणातील बेला येथे झाली कारवाई
जिवती तालुक्यातून नेलेल्या गारगोटी जंगलात जमा करुन नंतर ट्रकद्वारे शेणगाव, पाटण, भेंडवी, सोनापूर, गडचांदूर, कोरपना मार्गे औरंगाबाद येथे नेण्यात येते. या ट्रकवर तेलंगणा राज्यातील बेला येथे नुकतीच कारवाई झाली आहे. मात्र तालुक्यातून अद्याप अशी कारवाई झालेली नाही.