पालकमंत्र्याचे चौकशीचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:07 AM2017-08-04T00:07:06+5:302017-08-04T00:08:42+5:30
जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटाचे २४ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर गिलबिली येथे आयोजित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटाचे २४ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर गिलबिली येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात अन्य महिलांसोबत तालुक्यातील कवडजई येथील माजी सरपंच विमल मधुकर कोडापे (४२) या सहभागी झाल्या होत्या. मात्र प्रशिक्षण स्थळावरुन त्या २९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्या. या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार विमल कोडापे हिचे पती मधुकर हिरामन कोडापे (४८) यांनी ३१ जुलै रोजी केली. तेव्हापासून पोलीस प्रशासन माजी सरपंच विमल कोडापे यांचा शोध घेत आहेत. घटना घडून पाच दिवसांचा कालावधी लोटला, परंतु त्यांचा थागपत्ता कोठेही लागला नाही. यामुळे कवडजई गावातील नागरिकांचा आक्रोश वाढला असून गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांची भेट घेवून तपास कार्याला गती देण्याची विनंती केली.
बल्लारपूर तालुक्यातील कवडजई गिलबिली पाच-सहा किलोमीटरचे अंतर आहे. गिलबिली येथील एका ठिकाणी जीवन्नोतीच्या माध्यमातून निवडक बचत गटाच्या महिला प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले होते. २९ जुलैच्या रात्री अन्य महिला सोबत विमल कोडापेही मुक्कामाला होत्या. मात्र अचानक पायातील चपला व पर्स प्रशिक्षणस्थळी सोडून अचानक बेपत्ता झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. नातेवाईकांनी, प्रशासनातील कर्मचाºयांनी व पोलिसांना त्यांची शोधाशोध करुन त्या मिळाल्या नाही. त्यांचे कोणीतरी अपहरण तर केले नाही, या दिशेने पोलीस प्रशासन तपासाला लागले आहेत.
या घटनेमुळे कवडजई गावातील वातावरण तंग झाले असून बुधवारी जिल्हास्तरावर पत्र परिषद घेवून आक्रोश प्रकट करीत गावकºयांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. आज पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धाव घेवून विमल कोडापेच्या बेपत्ता प्रकरणाची कैफीयत मांडली. यामुळे माजी सरपंच महिलेचे बेपत्ताप्रकरण दिवसेंदिवस गंभीर वळण घेत असून गावातील नागरिकांचा आक्रोश वाढत आहे.
पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांना शोध घेण्यासाठी साकडे घालताना तपासाला गती देण्याची विनंती गावकºयांनी केली.
भाजपाचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटले
कवडजई येथील माजी सरपंच विमल कोडापे बेपत्ता झाल्याच्या घटनेला सहा दिवस झाले. परंतु आजतागायत त्यांचा शोध लागला नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक भयभीत झाले आहेत. मुलेही आक्रोश करीत आहेत, त्यांचे शोध कार्य जलदगतीने करण्यात यावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुद्धलवार, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. हरिश गेडाम, पंचायत समितीचे सदस्य सोशश्वर पद्मगिरीवार, कवडजईचे सरपंच प्रमोद ठाकरे यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांची भेट घेवून विमल कोडापेच्या तपास लावण्याची मागणी केली.