अधिवेशनात गाजणार गुंठेवारी
By admin | Published: June 4, 2014 11:38 PM2014-06-04T23:38:23+5:302014-06-04T23:38:23+5:30
येथील नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार असून सरकार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे.
बोगस प्रकरणाची चौकशी करा : तक्रारकर्त्यांची मागणी
मूल : येथील नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार असून सरकार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. बोगस गुंठेवारी प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकार्यांमार्फत करण्याची मागणी तक्रारकर्ते अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी केली आहे.
राज्य शासनाने २00१ मध्ये काढलेल्या गुंठेवारी नियमांचे उल्लंघन करुन मूल नगरपालिकेने शेकडो एकर जमिनींची गुंठेवारी केले. यात अतिक्रमण केलेल्या शासकीय जमिनी व मिळालेल्या जमिनींचीही गुंठेवारी करण्यात आली. नगरपालिकेने केलेल्या या गुंठेवारी प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुंठेवारीची ही प्रकरणे उपविभागीय अधिकार्यांपर्यंत गेलीच नाही. बोगस गुंठेवारी करुन शासनाचे विकास शुल्कही गडप करण्याची किमया मूल नगरपालिकेने केली आहे.
ब्रह्मपुरी येथील बोगस गुंठेवारी प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजले. गुंठेवारी प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई सुरू आहे. परंतु मूल नगरपालिकेने केलेली बोगस गुंठेवारी ब्रह्मपुरीपेक्षा फार मोठी आहे. यात पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत.
नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर यासंबंधाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी प्रकरणाची तक्रार आयुक्तांकडे केली.
तसेच काही आमदारांनी भेट घेऊन विधिमंडळात या प्रकरणाचे प्रश्न उपस्थित केले. मोगरे आणि मार्गनवार यांच्या तक्रारीवरुन विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात प्रकरणासंबंधाने लक्षवेधी सूचना सादर करण्यात आली होती. यावेळी शासनाने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले. परंतु या प्रकरणाची चौकशी मंदावली असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे.
मात्र, आता हा विषय तारांकित प्रश्न लागल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा माहिती गोळा करण्याच्या कामात व्यस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने मूल नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारी प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्फतीने काटेकोर करणे आवश्यक आहे. पालिकेने बोगस गुंठेवारी करून नागरिकांची फसवणूक केलीच, शासनाचेही विकास शुल्क हडप केले. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारकतर्फे अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)