कायम अपंगत्व आलेला गुरुदास शासकीय लाभापासून वंचित

By admin | Published: June 26, 2017 12:36 AM2017-06-26T00:36:59+5:302017-06-26T00:36:59+5:30

तालुक्यातील घोडेवाही येथील गुरुदास नारायण शेंडे (४६) याला एका अपघातात कायम अपंगत्व आले आहे.

Gurdas, who has a permanent disability, is deprived of government gains | कायम अपंगत्व आलेला गुरुदास शासकीय लाभापासून वंचित

कायम अपंगत्व आलेला गुरुदास शासकीय लाभापासून वंचित

Next

दोन्ही पाय निकामी : स्लॅबवरून खाली कोसळला
उदय गडकरी। लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यातील घोडेवाही येथील गुरुदास नारायण शेंडे (४६) याला एका अपघातात कायम अपंगत्व आले आहे. मात्र त्याला गेल्या वर्षभरापासून शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.
भूमिहीन असलेला गुरुदास शेंडे शेतमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवित होता. १० वर्षांपूर्वी तो कोरपना तालुक्यातील नांदाफाटा जवळच्या तळोधी येथे कामासाठी कुटुंबासह गेला होता. मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत असताना तेथीलच एका सधन शेतकऱ्याकडे दोन वर्षापासून बारमाही मजूर म्हणून काम करू लागला. घराच्या स्लॅबवर काम करीत असताना गुरुदासचा तोल जावून खाली पडला. यातच त्याच्या दुर्दैवाची सुरुवात झाली. दोन्ही पाय व कंबरेला कायमचे अपंगत्व आले. त्याच्या हसत्या-खेळत्या संसाराला ग्रहण लागले.
या अपघातानंतर त्याचे कुटुंब उघड्यावर आले. त्याला उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र काही फायदा झाला नाही. पदरचे संपूर्ण पैसे संपले. सधन शेतकऱ्याने हात वर केले. गुरुदासच्या अपंगत्वामुळे होत्याचे नव्हते झाले. गत एक वर्षापासून पत्नी आणि दोन मुलांचा संसार चालविताना त्याची दमछाक होत आहे. शासकीय योजना असूनही गुरुदाससाठी निरुपयोगी ठरल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी जीवनदायी विमा योजनासारख्या योजना असताना त्या मिळविण्यासाठी प्रशानाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. निगरगट्ट प्रशासन वेगवेगळ्या कारणासाठी हेलपाट्या मारायला लावत आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गुरूदासच्या कुटुंबाला परिस्थितीशी दोन हात करताना दयनीय अवस्था पाहून समाजमन खिन्न होत आहे. आधीच दैवाने त्याच्या कुटुंबावर वज्राघात केला असताना प्रशासनाने तरी त्याच्या अगतिकतेकडे पाहून शासनाच्या स्योजनांचा लाभ त्याच्या पदरी पडावा, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Gurdas, who has a permanent disability, is deprived of government gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.