गुरु गोविंदसिंग व तुकाराम महाराजांच्या दिंडी पालखीने विरुरनगरी दुमदुमली
By admin | Published: January 13, 2017 12:34 AM2017-01-13T00:34:15+5:302017-01-13T00:34:15+5:30
संत तुकाराम महाराज समिती व धनोज कुणबी समाज मंडळ विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर स्टेशन येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज
धार्मिक वातावरण : तुकाराम महाराज महोत्सव सोहळा व गुरु गोविंदसिंग प्रकाश उत्सव
विरुर (स्टे.) : संत तुकाराम महाराज समिती व धनोज कुणबी समाज मंडळ विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर स्टेशन येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तसेच गुरुद्वारा सिंग सभा, विरुरच्या वतीने श्री गुरु गोविंद सिंग प्रकाश उत्सव साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने गावात दिंडी पालखी काढण्यात आली. यात शेकडो नागरिकांचा सहभाग होता.
सोमवारापासून महोत्सवाला सुरूवात झाली असून दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल आहे. मंदिर परिसरापासून भजनाच्या स्वरात निघालेल्या पालखीचे प्रस्थान झाले. गावातील प्रमुख मार्गाने पालखी निघाली. परमपूज्य संत तुकाराम महाराजांच्या जयजयकार, दिंडी पालखीने तसेच गुरु गोविंद सिंग प्रकाश उत्सवाने विरुरनगरी दुमदुमली. पहाटेला गावकऱ्यांनी ग्रामसफाई केली.
संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्र कार्यावर मान्यवरांनी तसेच तुंबडे महाराज यांनी रसाळ प्रवचन सादर केले. रात्री ८ वाजता गोहोकार महाराज व दत्ता मसे यांचे कीर्तन झाले. तसेच रात्री ११ वाजता संजय शिंदे महाराज यांचे भारुड व गोंधळ सादर केले. मंगळवारी सकाळी ८ वाजता संत तुकाराम महाराज यांची गाथा व दिंडी पालखी गावातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आली. पालखी फिरविल्यानंतर मंदिर परिसरात पालखीचे आगमन झाले. दुपारी ३ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम झाला. गुरुद्वारा सभा सिंग येथे अखंड पूजा पाठ करून दुपारी २ वाजता लंगर ठेवण्यात आले. (वार्ताहर)