सात तास व्हायोलीन वादन करून शिष्याची गुरुदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:49 AM2021-06-02T08:49:19+5:302021-06-02T08:49:34+5:30

विदुषी कला रामनाथ यांना वाढदिवसाचे गिफ्ट

Gurudakshina of the disciple by playing the violin for seven hours | सात तास व्हायोलीन वादन करून शिष्याची गुरुदक्षिणा

सात तास व्हायोलीन वादन करून शिष्याची गुरुदक्षिणा

Next

- परिमल डोहणे

चंद्रपूर : तो दहावीतील विद्यार्थी. घरी कुठलेही सांगीतिक वातावरण नाही; पण बालपणी व्हायोलिनचे वेड लागले आणि तीच त्याची साधना झाली. मागील पाच वर्षांपासून तो नियमित रियाज करतो. जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक, ऑस्कर नामांकित विदुषी कला रामनाथ या त्याच्या गुरू. गुरूंच्या वाढदिवसाला त्याने चक्क ७ तास व्हायोलिनचे धडे गिरवून शुभेच्छा दिल्या. त्याच्या या अनोख्या गुरुदक्षिणेचा कला रामनाथ यांनी स्वीकार केला. पहिल्यांदाच शिष्याच्या अशा शुभेच्छा अनुभवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील गुरूंना चंद्रपुरातील शिष्याच्या साधनेने जणू भुरळ पाडली.

चंद्रपुरातील कबीर शिरपूरकर (१६) याला व्हायोलिन वादनाचे अभिजात आकर्षण आहे. तसा हा फार दुर्मीळ छंद. तो लोकमान्य टिळक विद्यालयात दहावीत शिकतो. त्याचे वडील गोपाल शिरपूरकर प्राथमिक शिक्षक. मुलाच्या छंदाची जोपासना करण्यासाठी त्यांनी ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या व ऑस्कर नामांकन प्राप्त प्रख्यात व्हायोलिनवादक आंतरराष्ट्रीय विदुषी कला रामनाथ या गुरूंशी भेट करून दिली. कबीर मागील पाच वर्षांपासून व्हायोलिनवादनाचे ऑनलाइन धडे त्यांच्या मार्गदर्शनात गिरवतो आहे. रोज सहा तास रियाज करून त्याने अल्पावधीतच सिद्धता मिळवली आहे.

गुरू कला रामनाथ यांचा नुकताच वाढदिवस झाला. आपल्या गुरूंना कबीरने सकाळीच व्हाॅटस्ॲपने जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणाला, ‘मै आपको कुछ दे तो नही सकता लेकीन आपके जन्मदिन के अवसर पर पुरे छह घंटे रियाज करुंगा’. गुरूंचं उत्तर आलं- ‘ठीक है’. सध्या झूम मिटिंगवर त्याचे क्लास होतात. रोज त्याला काय रियाज केला हे व्हाॅटस्ॲप मेसेजने कळवावे लागते. कला रामनाथ यांच्या जन्मदिवशी रात्री कबीरने मेसेज केला. ‘आज पुरे सात घंटे मैने रियाज किया’. बाकी काय काय केले तेही सांगितले. ‘बहुत बढीया, मेरे जन्मदिनपर इतनी अनोखी भेंट आज पहली बार मिली है.’ या शब्दांत शिष्याच्या साधनेवर कला रामनाथ यांनी आनंद व्यक्त केला.

समर्पित साधना, त्यामुळे नि:शुल्क शिक्षण
गुरू कला रामनाथ यांनी कबीरला पहिल्या भेटीतच कठीण परिश्रम करावे लागतील, असे सांगितले. कबीर निष्ठेने समर्पित भावनेने व्हायोलिनचा रियाज करतो. अशी मुले या विद्येचा वारसा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या भारतात असतात तेव्हा कबीरला बोलावून प्रत्यक्ष ज्ञान देतात. कबीरचा रियाज आणि साधनेने आनंदित होऊन कला रामनाथ कबीरला नि:शुल्क शिक्षण देत आहेत, हे विशेष.

Web Title: Gurudakshina of the disciple by playing the violin for seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.