गुरूदेव सेवा मंडळातर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
By admin | Published: May 14, 2017 12:38 AM2017-05-14T00:38:36+5:302017-05-14T00:38:36+5:30
येथील अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी येथील तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे यांनी सत्कारादाखल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता व पुष्पगुच्छ प्रदान करून ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सन्मान केला.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे, मारोती सोयाम, तुळशीराम गोरे, श्रावण बानासुरे, रविकांत राठोड, रामभाऊ पेठकर, दीपक मेश्राम, इश्वरदास पेंदाम, गंगाधर बोडे यांची उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार यांच्या निस्वार्थी कार्य कर्तृत्वामुळे अमरावती विद्यापिठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव मिळाले. यामुळे राष्ट्रसंतांचे कार्य देशपातळीवर जाण्यास मोलाची भर पडली. विकासात्मक बाबीवर लक्ष देण्यासोबत संताच्या विचाराचे प्रसार-प्रचार करण्यास त्यांचे योगदान मोठे आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून त्यांचा गौरव केला आहे.