तपोभूमीत अवतरणार गुरुदेवभक्तांचा मेळा

By admin | Published: January 24, 2016 12:57 AM2016-01-24T00:57:49+5:302016-01-24T00:57:49+5:30

समस्त मानव जातीला मानवतेचा संदेश देणारे तथा भजनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून क्रांती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्धाने पावन झालेल्या...

Gurudevabhakta's fair will take place in the context | तपोभूमीत अवतरणार गुरुदेवभक्तांचा मेळा

तपोभूमीत अवतरणार गुरुदेवभक्तांचा मेळा

Next

राजकुमार चुनारकर खडसंगी
समस्त मानव जातीला मानवतेचा संदेश देणारे तथा भजनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून क्रांती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्धाने पावन झालेल्या व ज्या भूमीत राष्ट्रसंतांनी साधना केली याच गोंदेडा (गुंफा) भूमीत भरणाऱ्या यात्रेसाठी रविवारी गुरुदेव भक्तांचा मेळा भरणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखल्या जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजांविषयी मोठे प्रेम आहे. महाराजांसोबत परिसरातील अनेक प्रत्यक्षदर्शीही आहेत. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.
गोंदेडा (गुंफा) येथे राष्ट्रसंतांनी याच भूमीत १९५९ ला घुगरी काला केला तर महाराजांनी या भूमीत १९६१ ला पहिली यात्रा भरवली. तेव्हापासून अविरत ही यात्रा परिसरातील गुरुदेव भक्ताकडून भरवण्यात येते. या तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त श्रद्धेने गोंदेडा या गावात येवून गुरुदेवापुढे नतमस्तक होवून एक नवी उर्जा घेवून जातात.
रविवारी आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील हजारोच्या संख्येने गुरूदेव भक्त गोंदोड्यात दाखल होणार असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. (वार्ताहर)

मुनगंटीवार यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन
राष्ट्रसंताच्या पदस्पर्धाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) भूमीच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात चार करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमासाठी खा. अशोक नेते, आमदार मितेश भांगडीया, आमदार अनिल सोले, कीर्तीकुमार भांगडीया, विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुदेव भक्तांना मिळते नाटकाचीही मेजवानी
गोंदेडा यात्रेत येणाऱ्या भाविकांना रात्रीच्या मुक्कामादरम्यान व परिसरातील गावात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खांबाडा गावात ‘बाळा मीच तुझी आई रे’ व ‘भाऊ झाला वैरी’ या नाट्य प्रयोगाची मेजवानीही ठेवण्यात आली आहे.

गोंदेडा गुंफा यात्रेकरिता एक ते दीड लाख गुरुदेव भक्त येणार असल्याचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान शांतता सुव्यवस्थेसाठी ८० ते ९० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येईल. अपर पोलीस अधिकारी होमराज सिंह राजपूत यांनीही भेट दिली.
- संतोष ताले
पोलीस निरीक्षक, चिमूर

यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून विद्युत व्यवस्था, पिण्याची पाणी तसेच सुरक्षेसाठी गावातील ५० स्वयंसेवकांची तुकडी तयार करून कार्यरत आहे.
- राजेंद्र गुलाब धारणे
सरपंच.
 

Web Title: Gurudevabhakta's fair will take place in the context

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.