नोकरी टिकविण्यासाठी गुरूजी निघाले गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:34 PM2019-04-17T22:34:30+5:302019-04-17T22:35:09+5:30
‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : ‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे.
मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली. याला नवीन शिक्षण धोरण जबाबदार आहे. बहुतांश मोठ्या गावांमध्ये अनेकांनी शाळा सुरू केल्या. यामुळे विद्यार्थी मिळणे कठीण झाले. विद्यार्थी शोधता-शोधता शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहे. इंग्रजी माध्यामांच्या शाळा वाढल्याने पुन्हा आपत्तीची कुऱ्हाड कोसळली.
इंग्रजी माध्यम, जिल्हा परिषद आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांवरही मोठा परिणाम दिसू लागला. पालकांचा कल कॉन्व्हेंटकडे असल्याने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर परिणाम झाला. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढून घेतात. पण सद्यस्थितीत हे समीकरणच बदलले आहे.
शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवत आहे पाचवी आणि आठवीच्या तुकडीसाठी आवश्यक असलेले किमान विद्यार्थी कसे मिळविता येतील, याच खटाटोपामध्ये प्रत्येक शाळांचे शिक्षक तालुक्यात दिसत आहेत. नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी शोधा, असा आदेश दिला. विद्यार्थ्यांच्या अभावामुळे एखादी तुकडी कमी झाली तर शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे नोकरीच्या धास्तीपोटी शेकडो शिक्षक विद्यार्थी शोध मोहिमेला गावागावांत भटकंती करीत आहेत. विद्यार्थी मिळविण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्याची 'पूर्तता' शिक्षकांकडूनच केली जात आहे. परिणामी, उन्हाळी सुट्ट्या लागूनही शिक्षकांचा आनंद हिरावून घेतला आहे.
पायाभूत सुविधांचा अभाव
अनेक शाळांना विद्यार्थी मिळत नाही, यासाठी विविध कारणे आहेत. परंतु, कुटुंब नियोजन हेही कारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक कुटुंंबाला लहान कुटुंबाचे महत्त्व कळायला लागले आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ या संकल्पनेवरून आता अनेकांनी एक मुलीवर किंवा मुलावर कुटुंब नियोजन करीत आहेत, त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या तुकडीवर झाला आहे. विशेष म्हणजे शाळा चालविताना विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याकडे संस्थाचालकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याची टीका पालकांनी केली.
कॉन्व्हेंट कल्चर गावखेड्यांत
प्राथमिक व माध्यम शाळांसारखीच कॉन्व्हेंटचीही परिस्थिती झाली आहे. नागभीड शहरात कॉन्व्हेंटचे लोन पसरले आहे. कथित गुणवत्तेचे ढोल वाजवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. पण, त्या तुलनेत दर्जेदार सुविधा पुरविल्या जात नाही. विद्यार्थीच मिळत नसल्याने कॉन्व्हेंटचालकांना विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना गावागावांमध्ये पाठवित आहेत.