अभ्यास कोपऱ्यांमुळे ४२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ज्ञानप्रकाश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:51+5:302021-06-26T04:20:51+5:30
चंद्रपूर : कोरोना महामारीमुळे प्रचलित शिक्षणाच्या संकल्पना बदलाव्या लागल्या. शाळा बंदीमुळे मुलांचे भविष्य काळवंडेल की काय ही धास्ती पालकांच्या ...
चंद्रपूर : कोरोना महामारीमुळे प्रचलित शिक्षणाच्या संकल्पना बदलाव्या लागल्या. शाळा बंदीमुळे मुलांचे भविष्य काळवंडेल की काय ही धास्ती पालकांच्या मनात आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र, समस्या कायम आहेत. अशा अत्यंत कठीण काळात मागील शैक्षणिक सत्रात मॅजिक बस संस्थेने आठ हजार अभ्यास कोपरे (स्टडी कॉर्नर) तयार करून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानप्रकाश पोहोचविण्याचे कार्य केले.
कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. मात्र, शिक्षणात कुठेही खंड पडू नये, यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात अभ्यास कोपरा म्हणजे स्टडी कॉर्नर नावाची नवी संकल्पना राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मुलांना नियमित अभ्यासाची सवय लागावी. घरच्या घरीच अभ्यासाचे वातावरण तयार व आवड निर्माण व्हावी, हा उपक्रमाचा उद्देश आहे. शाळा बंद असतानाही मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी दूरध्वनीद्वारे विद्यार्थी व पालकांच्या संपर्कात होते. या उपक्रमाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन जिल्ह्यांत ८००० विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास कोपरे तयार करण्यात मॅजिकला यश आले, असा दावा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांनी केला आहे.
असे आहेत स्टडी कॉर्नर
मॅजिक बस संस्थेच्या उपक्रमाशी जुळणाऱ्या विद्यार्थ्यांना घराच्या एखाद्या कोपऱ्यात एक जागा तयार करून दिली जाते. त्या ठिकाणी विद्यार्थी तिथे आपले शैक्षणिक साहित्य ठेवतात. मॅजिककडूनही
प्रेरणादायी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थी या ठिकाणी नित्यनियमाने अभ्यास करतात. यासाठी मॅजिक बस संस्थेचे गुरुजन विद्यार्थ्यांशी संपर्कात राहतात. पालकांचीही मोठी मदत होते.
१२ ते १६ वयोगटात चैतन्य
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील शाळांमध्ये (एससीएएलई) कार्यक्रमांतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ४२ हजार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे शिक्षण व जीवन कौशल्य विकास हा कार्यक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे शिक्षणात खंड न पडता मुलांचा उत्साह कायम असल्याचे मॅजिकचे म्हणणे आहे.