व्यायामशाळा बलशाली युवक घडवितात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:27 PM2018-07-22T22:27:07+5:302018-07-22T22:27:34+5:30
‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ ही संकल्पना काळाची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून देशाला स्वच्छतेच्या दिशेने घेऊन जाण्यात यश मिळवले व स्वच्छतेला घेवून नवक्रांती घडविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ ही संकल्पना काळाची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून देशाला स्वच्छतेच्या दिशेने घेऊन जाण्यात यश मिळवले व स्वच्छतेला घेवून नवक्रांती घडविली. आज प्रत्येकाच्या मनामनात स्वच्छताविषयक जागृती निर्माण झाली असून स्वच्छतेबरोबरच स्वस्थ भारताचे स्वप्नही पूर्ण होताना आपण अनुभवतो आहोत. स्वस्थ भारत हे स्वच्छतेच्या माध्यमातून शक्य होत असले तरी स्वस्थ व सशक्त शरीर व्यायामाच्या माध्यमातून बलशाली बनविण्याचे कार्य व्यायामशाळांच्या माध्यमातूनच शक्य आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून श्री जगनगुरू व्यायामशाळा या दृष्टीने भरीव असे राष्ट्राभिमुख कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार केंद्रिय गृह राज्यमंत्री हसंराज अहीर यांनी काढले.
स्थानिक श्री जगनगुरू व्यायामशाळेचे रविवारी नुतनीकरण व अद्ययावत साहित्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, भाजपा नेते विजय राऊत, प्राचार्य राजेश इंगोले, श्री जगनगुरू व्यायाम शाळेचे अध्यक्ष देवानंद गुरू, धर्मशील काटकर, भाजयुमोचे प्रभारी अध्यक्ष मोहन चैधरी, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, नामदेव राऊत, अॅड. दत्ता हजारे, किशोर मसादे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, नगरसेविका आशा आबोजवार, संगिता खांडेकर, फैज काजी, विजय पराते, सुहास बनकर, विजय दैवलकर, विनोद शेरकी, राजू घरोटे, महेश अहीर, राजेंद्र खांडेकर, विकास खटी, श्याम राजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बलशाली युवा पिढी देशाचे सामर्थ्य असून या युवकांकडूनच भविष्यात राष्ट्राची सेवा घडणार आहे. त्यामुळे युवकांनी राष्ट्राच्या, समाजाच्या व कुटुंबाच्या कामी येण्यासाठी शरीर संवर्धनास महत्व देत व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी या व्यायामशाळेने निश्चितपणे भरीव कार्य केले आहे व अनेक क्रीडा प्रकारामध्ये युवकांना घडवून त्यांना नावलौकीक मिळवून देण्यास सहकार्य केले असल्याचे ना. अहीर यांनी या व्यायामशाळेबाबत बोलताना सांगितले.
यावेळी आ. नाना श्यामकुळे यांनी व्यायामशाळेचे महत्व अनन्यसाधारण असून यातून युवकांना प्रेरणा मिळते. एवढेच नव्हे तर त्यांचे शरीर स्वस्थ राखण्यास हे स्थळ मोलाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, व्यायामशाळांनी बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी बलशाली युवाशक्ती घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. यावेळी जगनगुरू व्यायामशाळेला आमदार निधीतून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करण्याची घोषणासुध्दा त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरू यांनी केले. या कार्यक्रमाला जगनगुरू व्यायामशाळेचे पदाधिकारी, कुस्तीगीर, व्यायामपटू व परिसरातील नागरिक उपस्थित होते.