गावठी डुकरांच्या हैदोसाने घाणीचे साम्राज्य वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:14+5:302021-09-24T04:33:14+5:30
ब्रह्मपुरी : गावठी डुकरे पालन करणाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात डुकरे सोडण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली ...
ब्रह्मपुरी : गावठी डुकरे पालन करणाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात डुकरे सोडण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन डुकरांना शहराबाहेर घालवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ब्रम्हपुरी शहराचा विकास मागील दहा ते पंधरा वर्षांत झपाट्याने झाला. त्यामुळे नव्याने अनेक वस्त्या निर्माण झाल्या. शहरात मोठ्या प्रमाणात तलाव व बोडी आहेत, तसेच जुन्या वस्त्यांच्या आजूबाजूला शेतजमीन आहे. या भागात सहजपणे डुकरे राहू शकतात. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून डुकरे पालन करणाऱ्यांनी शहरात मोकाट डुकरे सोडली. वर्षागणिक डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी अनेक भागात अस्वच्छता दिसून येते. डुकरांच्या विष्ठेतून स्पेक्ट्रम नावाचा जंतू निर्माण होतो. तो मानवासाठी अत्यंत घातक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे डुकरांना शहराबाहेर घालवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बॉक्स
केवळ बजावली नोटीस
डुकरे पालन करणाऱ्यांना न. प.ने डुकरांना शहराबाहेर काढण्याची नोटीस अनेकदा बजावली आहे. जाहीररीत्या तसे शहरात आवाहन करण्यात आले. डुकरे पकडून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट अनेकदा देण्यात आले. डुकरे पकडणारे येतात व डुकरे पकडून शहराबाहेर नेतात. मात्र, डुकरे पालन करणाऱ्यांशी साटेलोटे करून डुकरे परत त्यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती आहे.त्यामुळेच वारंवार कारवाई करूनही परिस्थिती जैसे थेच आहे.
कोट
नगर परिषद फंडातून डुकरे पकडण्याचे कंत्राट देऊन शहराबाहेर घालवण्याची कारवाई करण्यात येईल. सर्व डुकरे पालन करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. प्रसंगी अडथळा निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात येईल.
- आर. एस. ठोंबरे
स्वच्छता निरीक्षक,
नगर परिषद, ब्रह्मपुरी,
230921\screenshot_2021_0923_115806.png
मोकाट गावठी डुकरे