पहाडावरील तलाव, नाले कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:26 AM2018-01-12T00:26:10+5:302018-01-12T00:26:21+5:30
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिवती तालुक्यात ३३ गावे असून ७० हजार येथील लोकसंख्या आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपुर्ण कोरडवाहु क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पाऊस झाला नाही आणि जवळपास पाण्याची साठवणूक होईल, असे तलाव किंवा बंधारे तालुक्यात नाहीत.
काही गावात तर शासनाच्या महत्त्वाच्या योजनाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील शेतकºयांना शाश्वत शेती करता येत नाही आणि जास्त उत्पन्नही घेता येत नाही. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील तलाव-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना नवे वर्ष तहानलेले जाणार की काय, असे चिन्ह दिसून येत आहेत.
जिल्हा प्रशासनाने लवकरच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिवती तालुक्याच्या पहाडावर पाणी टंचाई नक्कीच उग्ररूप धारण करेल, यात शंका नाही.
पाण्यासाठी भटकंती
येल्लापूर, लांबोरी, टेकामांडवा येथील गाव तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो. परंतु यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ही तलावे समाधानकारक भरली नाही. उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबत जंगली प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
तलाव-नाल्याचे खोलीकरण आवश्यक
तालुक्यात निसर्गाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मोठे तलाव निर्माण करण्याची गरज आहे. तलाव बांधासोबतच तलाव-नाल्याचे खोलीकरण केल्यास नक्कीच पहाडावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळेल. यासाठी शेतकºयांना सुद्धा तेवढेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.