राज्यातील अर्धेअधिक हिरकणी कक्ष बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:07 PM2019-04-17T14:07:01+5:302019-04-17T14:08:42+5:30

राज्यातील बसस्थानकावर २०१३-१४ मध्ये तब्बल ४५० हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. मात्र आजघडीला यातील बहुतांश कक्ष बंद असून स्तनदा मातांना बसस्थानकावर आडोसा शोधावा लागत आहे.

Half of the Hirkani rooms in state are closed | राज्यातील अर्धेअधिक हिरकणी कक्ष बंद

राज्यातील अर्धेअधिक हिरकणी कक्ष बंद

Next
ठळक मुद्देस्तनदा माता शोधतात बसस्थानकावर आडोसाबालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रवासादरम्यान बाळांना स्तनपान करताना मातांना त्रास होऊ नये, त्यांनी अन्य पर्यायाचा अवलंब करू नये, त्यांना मोकळ्या वातावरणात बाळाला दूध पाजता यावे, यासाठी राज्यातील बसस्थानकावर २०१३-१४ मध्ये तब्बल ४५० हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. मात्र आजघडीला यातील बहुतांश कक्ष बंद असून स्तनदा मातांना बसस्थानकावर आडोसा शोधावा लागत आहे. ज्या उद्देशाने हा कक्ष स्थापन करण्यात आला होता, त्याचा महामंडळ प्रशासनाला विसर पडला आहे.
प्रवासादरम्यान विशेषत: बसस्थानकावर स्तनदा माता बाळांना दूध पाजताना लाजतात. अनेकवेळा बाळ रडत असताना त्या पाणी किंवा इतर पेय देवून त्याला थांबविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम पडतो. या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांच्या संकल्पनेने चंद्रपूर येथील बसस्थानकावर २९ एप्रिल २०१३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पहिले हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षाची दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दीपक कपूर यांनी एक पत्र काढून प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या विभाग नियंत्रकांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर बहुतांश बसस्थानकावर या कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षामध्ये बसण्यासाठी योग्य जागा, पिण्यासाठी पाणी, साहित्य ठेवण्यासाठी टेबल, पुरेशी हवा येण्यासाठी खिडकी, पंखा, कुलर, खिडक्यांना पडदे, मातांना सुरक्षित वाटावे असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र सध्यास्थितीत अपवाद वगळता या कक्षांची स्थिती बिकट असून राज्यातील अर्धेअधिक हिरकणी कक्ष बंदअवस्थेत आहे.

महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार
भारतातील सर्व राज्यातील नाविण्यपूर्ण योजनेसंदर्भात २०१४ मध्ये शिमला येथे परिषद पार पडली. या परिषदेमध्ये नाविण्यपूर्ण योजनेंसदर्भात महाराष्ट्र शासनाने हिरकणी कक्षासंदर्भात सादरीकरण केले. यासाठी केंद्रशासनाचा महाराष्ट्राला प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. विशेष म्हणजे, या परिषदेतील सादरीकरणानंतर तत्कालीन तामीळनाडूतील जयललिता सरकारने दखल घेत राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

उद्घोषणाही बंद
बसस्थानकावरील हिरकणी कक्षाची प्रवाशांना विशेषत: स्तनदा मातांना माहिती व्हावी यासाठी प्रत्येकवेळी उद्घोषणा करण्यासंदर्भातही महामंडळाने प्र्रत्येक आगार प्रमुखांना कळविले होते. काही दिवस या कक्षासंदर्भात उद्घोषणेद्वारे माहिती देण्यात येत होती. मात्र आता माहितीही देणे बंद झाले आहे.

मातांना आत्मसन्माने स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यासंदर्भात संकल्पना सुचली. त्यानुसार चंद्रपुरात कक्ष स्थापन केला. याची दखल घेऊन इतर बसस्थानकावर कक्षांची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्यास्थितीत अनेक कक्ष बंद आहे. शासन तसेच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मातांना न्याय मिळवून द्यावा.
- डॉ. किशोर भट्टाचार्य, वैद्यकीय अधिकारी, टेमुर्डा.

Web Title: Half of the Hirkani rooms in state are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार