पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांची पाठ !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:39 PM2024-07-12T16:39:10+5:302024-07-12T16:41:46+5:30
Chandrapur : नागभीड तालुक्यात १४,२८२ शेतकऱ्यांनीच काढला विमा
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यात पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. मात्र, ११ जुलै २०२४ पर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून एक रुपयांत पीकविमा काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी १५ जुलै २०२४ ही पीकविमा भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत आहे. एक रुपयात पीकविमा ही योजना त्यापैकीच एक योजना. या योजनेची जाहिरात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या जाहिरातीवरून शेतकरीही पोर्टलवर नोंदणी करून पीकविमा काढत आहेत. जे शेतकरी बँका आणि सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेतात, त्यांच्या पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करण्यात येते. वैयक्तिकरीत्याही काही शेतकरी पीकविमा काढत आहेत. एक रुपयात पीकविमा, अशी जाहिरात शासनाकडून करण्यात येत असली तरी पूर्ण कागदपत्रांसाठी १०० ते १५० रुपये यासाठी खर्च होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या जाहिरातीमध्ये भात पीक वगळून असा एक उल्लेख करण्यात आला आहे. यावरून अनेक शेतकऱ्यांमध्ये संदेह निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या पत्रकात भात, ऊस व ताग असा उल्लेख करण्यात आला होता. याकडे 'लोकमत'ने लक्ष वेधले होते. यावर्षी ऊस व ताग हे शब्द जाहिरातीतून वगळण्यात आले असले, तरी भात हा शब्द कायम आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबद्दल संभ्रम कायम आहे.
कंपनी लाभ देत नाही
या तालुक्यात दरवर्षी निसर्गाच्या अव- कृपेमुळे, कधी विविध रोगांच्या आक्र मणामुळे तर कधी अन्य कारणांमुळे धान पिकाचे उत्पादन निम्म्यावर होत असते. असे असूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना कोणताच लाभ देत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा काढण्यास टाळाटाळ करतात, अशी शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.
लोनमुळे वाढला आकडा
अनेक शेतकरी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. हे शेतकरी सोसायट्यांकडून पीककर्ज उचलत असतात. त्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात येते. शिवाय बँकांकडूनही पीककर्ज देण्यात येते. बँकांही पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करीत असतात. त्यामुळेच हा आकडा १४ हजारां- पर्यंत गेला अशी यासंदर्भात चर्चा आहे.
"नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी सभासद आहेत. त्यापैकी ११ जुलैपर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल."
- शिवकुमार पुजारी, तालुका कृषी अधिकारी नागभीड.