भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:00 AM2023-02-10T11:00:01+5:302023-02-10T11:35:26+5:30
हंसराज अहीर यांच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
चंद्रपूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे भाऊ हितेंद्र अहीर यांचा डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉ. झाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
अहीर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहीर यांना १२ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी महिना उलटल्यानंतर अहीर यांनी भावाच्या मृत्यूला डॉ. झाडे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे.
पोलिसांनी जबाब नोंदवला
माजी राज्यमंत्र्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. झाडे यांचे रुग्णालयत गाठून त्यांची चौकशी केली. यानंतर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. याबाबत खुलासा करताना डॉ. झाडे म्हणाले, "हितेंद्र अहीर यांना गंभीर अवस्थेत आणले होते. अवघ्या पाच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. यात माझी चूक नाही. या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली
डॉ. झाडे हे काँग्रेसचे नेते आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात बल्लारपूरमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. यासोबतच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाबाहेर राहून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना मदत केली. दुसरीकडे अहीर यांनी केलेल्या या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.