चंद्रपुरात मनसैनिकांनी केले हनुमान चालिसा पठण; पोलिसांच्या नोटीसनंतर शांततेत आरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 06:31 PM2022-05-05T18:31:52+5:302022-05-05T18:35:25+5:30
जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली.
चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाणी टाकी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण केले.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली. त्यानंतर गुरुवारी सकाळच्या दरम्यान मनसे सैनिकांनी भोंगा न लावला शांततेत हनुमान चालिसा पठण तसेच आरती केली. यामुळे मात्र पोलीस प्रशासनावरील ताण अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, यासाठी पोलिसांची परवानगी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख, माजी नगरसेवक सचिन भोयर यांच्या उपस्थितीत भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यात सहभागी झाले होते.
मनसे भोंगे वाजविण्यावर ठाम
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे सैनिक सक्रिय झाले आहे. मनसैनिकांनी भोंग वाजविण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे. मात्र पडोली येथील मशीद, मंदिर १०० मीटर अंतरावर असल्याने पडोली पोलिसांनी भोंगा वाजविण्याची परवानगी नाकारली. तरीसुद्धा मनसैनिक भोंगे वाजविण्यावर ठाम असल्याची माहिती मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी सांगितले.