असे घडले गावगणराज्याचे विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:46 AM2018-06-08T00:46:40+5:302018-06-08T00:46:40+5:30
तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, ...
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, असा विचार राष्ट्रसंताच्या मनात आला़ त्यांनी तसे सुचितही केले. महाराजाची आज्ञा होताच दादा सहजपणे तयार झाले आणि एका गावगणराज्याच्या प्रेरणादायी विद्यापीठाची निर्मिती झाली.
गीताचार्य तुकारामदादा अड्याळ टेकडीवर आले, तेव्हा तेथे मानवी वस्ती अजिबात नव्हती़ केवळ कीर्र जंगल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या सुचनेनुसार दादांनी ३० जुलै १९६७ ला स्वत:चे आत्मबल सिद्ध करण्यासाठी अड्याळ टेकडीवर विधायक कार्याची सुरू केली. यावेळी राष्ट्रसंतानी उपस्थित राहून दादांच्या या कार्याला आशिर्वाद दिला. दादांच्या कार्यामुळे परिसरातील परिसरातील नागरिक प्रभावित होवू लागले़ एरवी टेकडीकडे कधीच न येणारेही दादांच्या कार्यापासून पे्रेरणा घेवू लागले़ दादांना लोकांच्या सहकार्याने या टेकडीवर राष्ट्रसंताच्या कल्पनेतील एक आदर्श गाव निर्माण करायचे होते. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सन्मार्गाचा संदेश दिला़ गावाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे धडे दिले़ गावगणराज्यातून माणूस कसा घडतो, याचे विविध प्रयोग सुरू केले़ दादांनी लोकाभिमुख कार्याचे जणू विद्यापीठच सुरू केले़ नागरिक तनमन धनाने श्रमदान करू लागले. श्रमदानातूनच आज या टेकडीचे रूपांतर एका गावात झाले आहे .
श्रमदानातून उभ्या झाल्या इमारती
सत्संग भवन, सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय,महिलाश्रम, ग्रामगीता विद्यापीठ, निसर्गोपचार केंद्र आदी विविध इमारतींची निर्मिती टेकडीवर करण्यात आली. इमारतींच्या निर्मितीकरिता नागरिकांनी केवळ लोखंड व सिमेंट खरेदी करून दिली़ अन्य सर्व कामे श्रमदानातूनच पूर्ण करण्यात आली आहेत.
निष्काम भावनेतून गावकऱ्यांनी केली मदत
टेकडीवरील इमारतींची पैशाच्या रूपात किंमत काढल्यास कोट्यवधी रुपये कमी पडतील़ पण दादांची किमया व राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून ही सर्व कामे केवळ श्रमदानातून उभी झाली आहेत. पण, या कामात पुढाकार घेणाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही की नावाचा फ लक लावण्यात आला नाही. दिलेल्या मदतीची पावतीसुद्धा नाही. जनतेच्या केवळ निष्काम भावनेने या लोकविद्यापीठाला आकार मिळाला आहे़