हरहर ऽऽ महादेवचा गजर
By admin | Published: February 25, 2017 12:31 AM2017-02-25T00:31:30+5:302017-02-25T00:31:30+5:30
आज महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांच्या भक्तीचा महापूर आला. जिल्ह्यातील जुगाद, राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर, नागभीड येथील टेकडी मंदिर व भद्रावती ...
शिवभक्तांची देवस्थानात गर्दी : जुगाद, सिध्देश्वर, नागभीड टेकडी मंदिर व भद्रनागस्वामी यात्रा
चंद्रपूर : आज महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांच्या भक्तीचा महापूर आला. जिल्ह्यातील जुगाद, राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर, नागभीड येथील टेकडी मंदिर व भद्रावती येथील भद्रनागस्वामी मंदिर परिसरातील यात्रेत भाविकांची गर्दी उसळली होती. याशिवाय गावागावातील शिवमंदिरातही आज भाविकांच्या रांगा पहायला मिळत होत्या. काल गुरुवारी दिवसभर निकालात गुरफटलेले नागरिक आज भक्तीत विलीन होऊन ‘हर हर महादेव..’चा गजर करताना दिसून आले.
घुग्घुसपासून काही अंतरावर असलेली जुगाद यात्रा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. वढा येथे वर्धा, पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनी असलेल्या काठावर प्राचीन हेमाडपंती शिव मंदिरात विदर्भातील शिवभक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ‘हर हर महादेव’च्या गजरात शिवलिंगाचे दर्शन घेतले.
१२ वर्षापूर्वी दुर्लक्षित असलेल्या अकराव्या शतकातील परमर कालिन राजा जगदेव यांनी या मंदिराची निर्मिती केली, असा इतिहास आहे. घुग्घुसचे तत्कालीन ठाणेदार पुंडलिक सपकाळे यांनी पुढाकार घेऊन वढा, जुगाद, घुग्घुस येथील सर्व धर्मियांच्या सहकार्याने या मंदिराचा जिर्णोध्दार केला. आज महाशिवरात्रीनिमित्त या मंदिर परिसरात शिवभक्तांची गर्दी उसळली होती.
आज पहाटे व्यंकटेश गिरी यांनी सपत्निक मंदिरात अभिषेक केला. त्यानंतर भाविकांच्या रांगाच रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. रात्रीपर्यंत भक्ताची गर्दी कायम होती. दरम्यान, केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आ. नाना शामकुळे यांनी मंदिरात येऊन पूजा केली. त्यांचा मंदिर कमिटीकडून सत्कार करण्यात आला. चंद्रपूरकडून वढा मार्गे येणाऱ्या भक्तांसाठी तात्पुरत्या पुलाची (सेतू) व्यवस्था मंदिर कमिटीने केली होती. कोलगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हेल्थ कॅम्प लावण्यात आला होता.
भाविकांनी घेतले शिवलिंंगाचे दर्शन
नागभीड येथील शंकर देवस्थान पहाड नागभीड ट्रस्टतर्फे प्रसिद्ध टेकडी शिवमंदिर येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले. गावातील तसेच गावाबाहेरील लाखो भाविकांनी पंचमुखी शिवलिंंगाचे दर्शन घेतले. गावातील पारंपारिक प्रथेनुसार कै. गजाननराव कामुनवार यांच्या घरून नंदीची मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी हजारोच्या संख्येने मिरवणुकीत उपस्थित राहून नंदीची पूजा केली.
राजुरा तालुक्यातील देवाडा येथील पुरातन सिद्धेश्वर देवस्थान येथील शिवालय महाशिवरात्री यात्रा आज भाविकांनी फुलली होती. पहाटे ६ वाजेपासून देवदर्शनासाठी भाविक रांगेत लागून दर्शन घेत होते. देवस्थान कमेटीकडून उपवास असणाऱ्या नागरिकांना उपवासाचा फराळ देण्यात आला. या यात्रेत तेलंगणातील भाविक उपस्थित होते. (लोकमत चमू)
भद्रनागस्वामी मंदिरात भाविकांच्या रांगा
भद्रावती : श्री भद्रनाग स्वामी देवस्थान भद्रावती येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर भरलेल्या यात्रेतही भाविकांची गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच भद्रनाग स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. पहाटे ३ वाजता भद्रनाग स्वामींची महापूजा व रुद्राभिषेक करण्यात आला. विश्वस्त मंडळाचे सचिव मधुकर सातपुते, कोषाध्यक्ष प्रकाश पाम्पट्टीवार सपत्निक महापुजेला बसले होते. यांनी विधिवत पूजाअर्चा केली. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.रमेश मिलमिले, एन.एकरे, मधुकर सहारे, योगेश पांडे, राजेश पांडे उपस्थित होते. २४ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत अनुभव डबीर महाराज नागपूर यांच्या किर्तनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. २ मार्चला भद्रनाग स्वामींची शोभायात्रा निघणार आहे.