कापणीला आलेले सोयाबीन अंकुरले
By admin | Published: October 3, 2016 12:45 AM2016-10-03T00:45:54+5:302016-10-03T00:45:54+5:30
गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने ...
पावसाचा परिणाम : हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया जाणार
गोवरी : गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीचा काळ आहे. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी केली नाही. सोयाबीनची कापणी केली तर पावसामुळे सोयाबीन सडून खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कापणी करण्याचे टाळले आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे सोयाबिन कापणीला आहे. पावसामुळे सोयाबीनची कापणी खोळंबली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या महाबीज सोयाबीनला त्याचा मोठा फटका बसला आहे. इतर कंपनीच्या सोयाबीनपेक्षा महामंडळाचे महाबीज सोयाबीन कापणीला लवकर झाल्याने पावसामुळे सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनचे कापणी करुन ढिग करुन ठेवले आहे. मात्र पाच- सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे.
यावर्षी सोयाबीन पिकांना चांगले दिवस येईल, असे वाटत असतानाच अवकाळी आलेल्या पावसाने सोयाबीनचा घात केला आहे. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना बळकटी देत असतात. हे पीक कमी कालावधीचे असल्याने शेतकरी यातून वर्षभराचा खर्च करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक ताण कमी होतो. परंतु यावेळी आलेली परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती. मात्र हाच पडणारा पाऊस सोयाबीन पिकांसाठी घातक ठरेल, असा विचारही शेतकऱ्यांच्या मनाला कधी शिवला नसेल. पावसामुळे बहुतांश शेतातील सोयाबीन अंकुरले असल्याने शेतकरी पुन्हा काकुळतिला आला आहे. (वार्ताहर)
पावसाने केला सोयाबीनचा घात
गेल्या पाच- सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हा पाऊस सर्व पिकांसाठी चांगला असला तरी सोयाबीन पिकासाठी घातक आहे. सोयाबीन सध्या कापणीवर आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर जिवाचे रान करुन शेतकऱ्यांनी उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब अंकुरले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक सडून खराब होत असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
- रामदास देवाळकर,
शेतकरी गोवरी,