जंगलातील बांबूची मुळासकट कटाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:56 PM2018-11-06T22:56:23+5:302018-11-06T22:56:38+5:30
वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चंद्रपुरातील एका जंगल ठेकेदाराने चंद्रपूर वनविभागातील जवळपास चार कम्पार्टमेंटमधील बांबूची मोठ्या प्रमाणात अवैध कटाई केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चंद्रपुरातील एका जंगल ठेकेदाराने चंद्रपूर वनविभागातील जवळपास चार कम्पार्टमेंटमधील बांबूची मोठ्या प्रमाणात अवैध कटाई केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, याबाबत मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या असून मुख्य वनसंरक्षकांनीही याबाबत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.
चंद्रपूर वनविभागात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यातून अनेकांना रोजगारही उपलब्ध केला जात आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील एका जंगल ठेकेदाराने भद्रावती वनपरिक्षेत्र, चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील बांबूची मुळापासून कटाई सुरू केली आहे.
बांबूचे जंगल अर्धेअधिक नाहिसे केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे वनविभागातील बांबू वाहतुकीचे वर्षभराच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. नव्याने वाहतुकीचे कंत्राट निघालेले नाही. बांबूची अवैध कटाई आणि चोरी करणारा हा ठेकेदार मात्र मुदत संपलेल्या कंत्राटाच्या भरवश्यावर हिरव्यागार बांबूची राजरोसपणे वाहतूक करीत असल्याची माहिती आहे.
या अवैध बांबू कटाईमुळे वनविभागाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वनविभागामार्फत बांबू कटाई करताना मुळापासून कटाई केली जात नाही. त्यामुळे पुढील दोन-अडीच वर्षात कटाई केलेल्या ठिकाणी नवीन बांबूचे उत्पादन होते. मात्र अवैध कटाई करणाºया जंगल ठेकेदाराने मुळापासून बांबूची कटाई केल्यामुळे या भागातून बांबू पुढील काही वर्षे मिळणारच नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या प्रकाराची गंभीरतेने चौकशी केल्यास बरीच अवैध कामे बाहेर येण्याची शक्यता आहे.