‘त्या’ पिवळ्या पावसाचे रहस्य कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:39 PM2017-08-06T23:39:41+5:302017-08-06T23:40:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या सावंगी दीक्षित या केवळ १५० लोकवस्तीच्या व ५० घरे असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या सावंगी दीक्षित या केवळ १५० लोकवस्तीच्या व ५० घरे असलेल्या खेड्यात गेल्या पाच दिवसांपासून पिवळ्या रंगाच्या थेंबांचा पाऊस पडत आहे. या घटनाक्रमाची माहिती पहिल्यांदा ‘लोकमत’ने प्रकाशित करून शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत तालुका प्रशासनानी दखल घेत प्रशासनाचा ताफा या सावंगी दिक्षीतकडे रवाना झाला आणि या प्रकाराची घटनास्थळी पाहणी केलीे. तेव्हा प्रशासनसुद्धा या रहस्यमयी प्रकाराबाबत आश्चर्यचकीत झाले.
शनिवारला दुपारी २ वाजता सावलीच्या तहसीलदार उषा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, पं.स. सावलीचे उपसभापती तुकाराम पा. ठिकरे यांनी संयुक्तरित्या पाहणी केली असून या प्रकाराचे नमुने, झाडांचे पाने, कवेलू व अन्य असलेल्या पिवळ्या थेंबाचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविण्यासाठी घेवून गेले. असे असले तरी सदर घटनाक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये अनेक तर्कवितर्कांना उधान आले असून याचा काही मानवी आरोग्यावर परिणाम होतो का, याची शहानिशा प्रयोगशाळेतून नमुने तपासून आल्यानंतरच होणार आहे. सध्या प्रशासन या घटनाक्रमाबाबत काहीही भाष्य करू शकत नाही. नागरिकांनी कुठलीही अंधश्रद्धा, अफवांवर विश्वास न ठेवता विज्ञानाच्या संशोधनावर विश्वास ठेवून दोन तीन दिवस संयम ठेवण्याचे आवाहन सावलीच्या तहसीलदार उषा चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.
मात्र मागील चार दिवस सायंकाळी ५.३० वाजता पडणाºया या रहस्यमयी पिवळ्या पावसाची वेळ बदलली असून शनिवारला सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान याच गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असलेल्या पुरुषोत्तम इंदोरकर यांच्या अंगणात व घराच्या स्लॅब, सांदवलीतील झाडांवर, चौकातील विहिरीच्या भिंतीवर नेहमीपेक्षा जास्त गर्द व दाट थेंबाचा पिवळा पाऊस पडल्याने प्रकारात वाढ होताना दिसत आहे. वृत्त लिहिस्तोवर पंचायत समिती, महसुल विभाग, आरोग्य विभाग, वनविभागाचे कर्मचारी अधिकारी या गावात भेटी घेवून रहस्यमयी प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. पिवळा पाऊस पडलेल्या विहिरीचे पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.